शिवाजी पार्कमध्ये होणाऱ्या सभेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल कुठलेही अपमान जनक वक्तव्य केल्यास राहुल गांधीना महाराष्ट्रात फिरू देणार नाहीत असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याया यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. तसेच येत्या 17 मार्चला या यात्रेचा समारोप होणार असून, काँग्रेसच्या भव्य यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेनं होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी हा इशारा दिला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी हा इशारा दिला आहे. यावेळी ते म्हणाले की, राहुल गांधी यांना एक नक्की सांगतो की, छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाच्यासमोर आहे. त्यांचे घरही मैदानाच्या जवळ आहे. तुम्ही महाराष्ट्रात येत आहात. तर तुमचे म्हणणे मांडा, यासाठी आमचा नकार नाही. पण इथे येऊन मागच्यावेळासारखे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल कोणतेही अपमानजनक वक्तव्य केले तर महाराष्ट्रातील 14 कोटी जनता राहुल गांधींना महाराष्ट्रात फिरायला देणार नाही.
या कोल्ह्यांसोबत जे लांडगे सामील झाले आहेत, त्यांनीपण हे लक्षात ठेवावं, महाराष्ट्रात त्यांची मग काही खैर नाही. त्या कोल्हेकुईला साथ देणाऱ्या लांडग्यांनाच सांगतोय. आमचा इशारा आहे’ अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी ठाकरे गटालाही सुनावलं. हा ईशारा देत असताना देशपांडे यांनी काँग्रेसचा कोल्हे म्हणून तर ठाकरे गटाचा लांडगे म्हणून उल्लेख केला. येत्या 17 तारखेला राहुल गांधी यांती शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. त्यापूर्वीच मनेसेने हा स्पष्ट शब्दांत इशारा दिलाय.
