वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात आंबेडकर मोठा निर्णय घेऊ शकतात.
प्रकाश आंबेडकर उद्या सकाळी 11 वाजता राजकीय भूमिका जाहीर करणार असून, यासाठी आज वंचित बहुजन आघाडीकडून राज्य कार्यकारिणीची बैठक बोलवण्यात आली आहे. आंबेडकर 28 मार्चला अकोल्यातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीचा घटक म्हणून की स्वतंत्र लढणार यावर उद्याच्या पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब होणार आहे. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकर आजच आपली भूमिका स्पष्ट करणार होते. मात्र, महाविकास आघाडीकडून ‘आज घाईत कोणताही निर्णय घेऊ नका’ अशी विनंती करण्यात आल्याने प्रकाश आंबेडकर उद्या आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तर, आजच्या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे.
प्रकाश आंबेडकर उद्या निर्णायक भूमिका जाहीर करू शकतात,त्याच पार्श्वभूमीवर या बाबतचे संकेत देणारा एक व्हिडिओ जरी केला आहे.या व्हिडिओच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या संदर्भात आंबेडकर मोठा निर्णय घेऊ शकतात.
वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, फुले-शाहू-आंबेडकरी विचारांच्या मतदारांना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन,” अशा शीर्षकाखाली वंचित आघाडीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे की, “वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वंचित आघाडीने युतीबाबत काय केले पाहिजे, याबाबतचा सल्ला दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या आजोबांनी चालवलेली चळवळ लाचारीच्या विरोधात होती आणि लाचारी मीही मान्य करणार नाही. निवडणुकीत अडचण येऊ नये म्हणून आम्हीही व्यक्तिगत हेवेदावे केले नाहीत. मात्र आता चळवळीलाच लाचार केलं जात आहे आणि लाचार करून संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आम्ही कदापीही मान्य करणार नाही,” असं म्हणत आंबेडकर यांनी अप्रत्यक्षरित्या मविआला इशारा दिला आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक – संजय राऊत
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. प्रकाश आंबेडकर हे मविआमध्ये आहेत. महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांना चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे, तो अजूनही कायम आहे. बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा आम्हाला माहीत आहे, त्यांचा संघर्ष आम्हाला माहीत आहे. त्यांचं संघटनात्मक कौशल्य आम्हाला माहीत आहे. बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात पण त्यांचं त्याच्यामध्ये समाजहीत असतं. हीच त्यांची ताकद आहे. आम्ही वारंवार संवाद साधून आहोत अस राऊत यांनी म्हटलं आहे.
