सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राम सातपुते जाहीर होताच भाजपच्या गोटात जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी सायंकाळी राम सातपुते सोलापूर शहरात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. बाहेरील उमेदवार अशी टीका होताना, राम सातपुते यांनी शिंदे परिवाराला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. खासदारकीला सुशीलकुमार शिंदेंचा दोन वेळा पराभव झाला होता, त्यांच्या पत्नी उज्वला शिंदे यांचा एकदा पराभव झाला. तीन वेळा पराभव झालेल्या शिंदे परिवाराला पुन्हा चौथ्यावेळी धूळ चारु, असे चॅलेंज राम सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना दिले आहे.
राम सातपुतेंनी शिंदे कुटुंबीयांच्या राजकीय इतिहासाची आठवण करून प्रत्युत्तर दिले. प्रणिती शिंदे यांच्या वडिलांनी कधी करमाळा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूरमधून निवडणूक लढलेली आहे. मग ते उपरे होते का? असा सवाल सातपुतेंनी उपस्थित केला आहे.करमाळा मतदारसंघातून सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढवली होती. शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि जनतेने सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांना निवडूनदेखील दिले होते. त्यावेळी ते उपरे नव्हते का? असा सवाल सातपुते यांनी उपस्थित करीत प्रणिती यांना टोला लगावला. तीन वेळा पराभव झालेल्या शिंदे परिवाराला पुन्हा चौथ्या वेळी धूळ चारू, असे आव्हान सातपुते यांनी प्रणिती शिंदे यांना दिले आहे.
राम सातपुते सोमवारी सायंकाळी सोलापूर शहरात दाखल झाले होते.यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले होते. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना राम सातपुते म्हणाले की, सुशील कुमार शिंदे यांनी करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.त्यावेळी ते उपरे नव्हते का? शरद पवार यांनी बारामती येथून येऊन माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती.आणि जनतेने सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांना निवडून देखील दिले होते. त्यावेळी ते उपरे नव्हते का असा उपरोधिक टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.
दरम्यान बाहेरील उमेदवार पुन्हा एकदा सोलापूरला मिळाला असा प्रश्न विचारताच राम सातपुते म्हणाले, सोलापूरच्या विविध साखर कारखान्याशी निगडित मी ऊसतोड केली आहे.माझ्या आई वडिलांनी या सोलापुरात सालगडी म्हणून काम केलं आणि मी देखील जनतेचा सालगडी म्हणून सेवा करेन अशी ग्वाही राम सातपुते यांनी दिली.
