ठाकरे गटाच्या यादीवर काँग्रेसची तीव्र नाराजी; आघाडी धर्माला गालबोट लावल्याचा काँग्रेसचा आरोप

शिवसेना ठाकरे गटाने आज लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली आहे. संजय राऊत यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने लोकसभेची पहिली यादी जाहीर करत आहोत असं म्हणत त्यांनी 17 नावं जाहीर केली आहेत. मुंबईतल्या चार आणि महाराष्ट्रातल्या इतर १३ जागांची ही यादी आहे. सांगलीमध्ये डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र हे सगळं असताना काँग्रेसने उद्धव ठाकरेंवर नाराजी व्यक्त केली आहे.देशात इंडिया आघाडी विस्कळीत झाली तशीच राज्यातही महाविकास आघाडी विखुरल्याजात असताना दिसत आहे.

ठाकरे गटाची भूमिका आहे, की त्यांनी काँग्रेससाठी कोल्हापूरची जागा सोडली, तर काँग्रेसने सांगलीची जागा त्यांच्यासाठी सोडली पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना सांगलीचं तिकीट देण्याचा शब्द दिला होता आणि ठाकरे गटाच्या पहिल्या यादीत त्यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे. हे काँग्रेसच्या राज्य नेतृत्वाला आवडलेलं नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं, की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील काँग्रेसकडून ही जागा लढवणार आहेत. 2014मध्ये सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. 2014मध्ये प्रथमच काँग्रेसच्या उमेदवाराला भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी काँग्रेसला पराभवाची धूळ चारली आणि 2019 मध्येही ती जागा आपल्याकडे राखण्याच भाजपला यश आलं. या दोन निवडणुकांमध्ये या जागेवर भाजपने काँग्रेसचा पराभव केला.

अशातच मविआत या जागेवरून मतभेद असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत गेलेल्या विश्वजीत कदम यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे की, सांगलीची जागा आमचा पारंपारिक मतदारसंघ आहे. देशाला स्वतंत्र मिळाल्यापासून 2014 पर्यंत सांगलीने काँग्रेस पक्षाला खासदार दिला आहे. आज देखील आमचे दोन आमदार येथून आहे. राष्ट्रवादीचे देखील आमदार आहे. सांगलीत काँग्रेसचे संघटन आहे, काँग्रेसची विचारसरणी आहे. त्यामुळे आम्हाला येथून उमेदवारी मिळाली पाहिजे असे विश्वजित कदम म्हणाले आहेत.

सांगलीच्या जागेबाबत बोलताना विरोधीपक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे,ते म्हणाले, मविआच्या जागांच्या संदर्भात बैठक झाली आहे. बैठक अंतिम निर्णय व्हायचा असताना, तसंच मविआची चर्चा संपली नसताना उद्धव ठाकरेंना दोन जागांवर उमेदवार घोषित केला आहे. त्यांनी आघाडीचा धर्म पाळला असता तर आनंद झाला असता. तीन पक्ष मिळून निर्णय घ्यायचा असतो. चर्चा संपलेली नसताना उमेदवारी घोषित करणं हे आघाडी धर्माला गालबोट लावणं आहे. यावर उद्धव ठाकरेंनी पुनर्विचार केला पाहिजे. तसं घडलं तर खुल्या मनाने निवडणूक पार पाडता आली असती.”

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील ठाकरे गटावर नाराजी व्यक्त केली आहे.सांगलीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.थोरात म्हणाले आघाडीत काही जागांवर चर्चा सुरु आहे,आघाडी धर्म पाळणे सर्वांची जबाबदारी असल्याचं सर्वांची जबाबदारी असल्याचं थोरात म्हणाले,अशा प्रकारे चर्चा सुरु असताना जागा जाहीर कारण योग्य नाही,आमचा आजही भिवंडी आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रह असून ठाकरेंनी याचा फेरविचार करावा असंही थोरात म्हणाले.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.यावर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या उमेदवारीला विरोध केला आहे.निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती. आज पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची नाराजी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली. ”खिचडी चोर उमेवारासाठी मी प्रचार करणार नाही”, अशा शब्दांत निरुपण यांनी हल्ला चढवला व कीर्तिकरांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

प्रकाश आंबेडकर यांची स्वतंत्र लढण्याची घोषणा

प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केली आहे. इतकच नाही, प्रकाश आंबडेकर यांनी काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. महाविकास आघाडी सोबत जाण्यासाठी त्यांनी काही जागांची मागणी केली होती. पण मविआकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत नव्हता. संजय राऊत यांनी मविआला चार जागा देण्याची तयारी दर्शवली होती. अखेरचा प्रयत्न म्हणून वंचित बहुजन आघाडीला एक जागा वाढवून दिली. पण अखेर प्रकाश आंबेडकर यांनी आपला एकला चलो रे चा मार्ग पत्करला आहे.