खिचडी चोर अमोल कीर्तिकर यांचा प्रचार करणार नाही; ठाकरे गटाच्या उमेदवार यादीमुळे संजय निरुपम आक्रमक

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने महाविकास आघाडीत वादाला सुरवात झाली आहे. अमोल कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून काँग्रेस नेते संजय निरुपम प्रचंड आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काँग्रेस नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झाले असून, आता माझ्यासमोर सर्व पर्याय खुले असतील. आठवडाभरात मी मोठी घोषणा करू शकतो, आता आरपारची वेळ आली असल्याचे संजय निरुपम म्हणाले आहेत.

गजानन किर्तीकर हे शिवसेनेत आहेत आणि मुलगा अमोल किर्तीकर उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत. अमोल किर्तीकर यांना उमेदवारी मिळाल्याने कॉंग्रेस नेते संजय निरुपम चांगलेच संतापले आहेत. निरुपम यांना उत्तर पश्चिम मुंबईतून उमेदवारी हवी होती. आज पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांची नाराजी माध्यमांसमोर स्पष्टपणे बोलून दाखवली. ”खिचडी चोर उमेवारासाठी मी प्रचार करणार नाही”, अशा शब्दांत निरुपण यांनी हल्ला चढवला आहे.

माझ्या वरीष्ठ नेत्यांना आग्रह करतो की, शिवसेनेला यासंदर्भात जाब विचाराला हवा. आमच्या नेतृत्वाला काही चिंता वाटत नाही आहे. मला मागील 10 दिवसात कोणीही संपर्क केला नाही आणि विचारलं नाही. आपण काय करु शकतो. काँग्रेस कार्यकर्त्यांसोबतच न्याय होत नाही आहे. न्यायाच्या गप्पा मारणारे आपल्याच कार्यकर्त्यांवर अन्याय करतायत. माझा हक्क बनतो इथून लढण्याचा आणि आमचे नेतृत्व शिवसेनेला सरेंडर झालं. मी माझ्या नेतृत्वाला सांगू इच्छितो, माझ्याकडील सर्व पर्याय खुले असतील. एका आठवड्याहून अधिक वेळ मी नाही देऊ शकत. काँग्रेसला वाचवण्यात मुंबईतून आम्ही अपयशी झालोय हे दिसतंय. सांगलीची जागा त्यांनी घोषणा केली यावरुन स्पष्ट दिसतंय की काँग्रेसची त्यांना गरज नाही, असं निरुपम म्हणाले.

एकेकाळी मुंबईतील सहाही जागांवर काँग्रेसचं प्राबल्य होतं, तिथे आज जर पक्षाच्या वाट्याला केवळ एक जागा येत असेल तर हा मुंबईतील काँग्रेसचं अस्तित्व संपवण्याचा घाट घातला जात आहे, याचा विचार व्हायला पाहिजे, असा आरोपही संजय निरुपम यांनी केला आहे.

“वरिष्ठ नेतृत्त्वांकडून माझी अपेक्षा होती की २०१९ ला निवडणूक हरल्यानंतर मी माझ्या मतदारसंघात सक्रिय आहे. त्यामुळे या जागेवरून निवडणूक लढवण्याचा मला अधिकार आहे. परंतु, शिवसेनेने आम्हाला दाबलं. आणि दबले गेलो आहोत. आज असं दृष्य आहे की ज्या शिवसेनेची स्वतःचं काही अस्तित्व नाही त्यांच्यासमोर आम्ही झुकले आहोत. शिवसेनेचा जनाधार नाहीय. अशा कमी जनाधार असलेल्या पक्षासमोर काँग्रेसने झुकणं हे श्रद्धांजली लिहिण्याचा कार्यक्रम सुरू झालाय, असं दिसतंय”, असं संजय निरुपम म्हणाले.