महाविकास आघाडीसोबत चर्चेची दारं खुली; मात्र सकारात्मक प्रतिसाद नाही – प्रकाश आंबेडकर

वंचितच्या पाठीत संजय राऊत यांनी खंजीर खुपसला, असं खळबजनक ट्वीट वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतच केलं होतं. त्यानंतर राजकीय वातावरण तापलं होतं. अशातच प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, आमच्याकडे तीन जागांचा प्रस्ताव आला होता, त्यानंतर कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यांनी आघाडीत बिघाड केलाय, हे आम्हाला दाखवायचे होते.

महाविकास आघाडीसोबत एकत्र जाऊन या निवडणुका लढवाव्यात अशी आमची तयारी होती. मात्र, महाविकास आघाडीकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.राज्यात अजूनही आपण समविचारी संघटना आणि पक्षांशी चर्चा करत आहोत. मराठा आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांच्याशीही आपली चर्चा झाली आहे. ते येत्या एक ते दोन दिवसांत आपली यादी देणार आहेत. सकल मराठा संघटना या जंरांगे पाटील यांच्यासोबत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करून लवकरच या बाबतीतला निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. राज्यातील अन्य समविचारी संघटना आणि पक्ष यांच्याशीही चर्चा चालू आहे. मात्र, नेमक्या कोणत्या संघटनांसोबत चर्चा आहे हे सांगण्यास त्यांनी नकार दिला.

राज्यात ज्या पद्धतीने विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे होता तो राहत नाही. महाविकास आघाडीच्या माध्यमातून विरोधी आघाडी उभी राहावी हे आमचं मत होतं. पण आम्हाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला. आम्ही इतरांना सोबत घेऊन नवी आघाडी करत आहोत. कुणाला साईड ट्रॅक करू नये, सर्वांना सोबत घेऊन काम करावं असं आमचं म्हणणं आहे. 2 तारखेला सर्व काही आम्ही सांगणार आहोत, असं आंबेडकर म्हणाले.निवडणुकीचा पहिला टप्पा येतोय. मी आधीपासूनच यांचं जमत नाही असं सांगत होतो. त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. त्यांनी आपलं कोंबडं झाकलं आहे. ते दाखवायला तयार नाही. शिवसेना आणि काँग्रेस यांचं सूत जमलेलंच नाही. ते आता उघड व्हायला लागलं आहे, असा दावाही त्यांनी केला. मला भांडणं लावायचं नाही. तोडायचं नाही. जेव्हा तोडायचं तेव्हा मी तोडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

महाविकास आघाडीत काही जागांवरील वाद अद्याप कायम

महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र तरीदेखील काही जागांवरील वाद अद्याप कायम आहे. सांगली, भिंवडी, दक्षिण मध्य मुंबई या अशा काही जागा आहेत, जेथे काँग्रेसने माघार घेण्यास नकार दिला आहे. सांगलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेने चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर आमच्याशी चर्चा न करताच ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, असं काँग्रेसचं मत आहे. भिवंडीच्या जागेचीही हीच स्थिती आहे. भिवंडी या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. काँग्रेसला जागा दिल्यास आम्ही वेगळा निर्णय घेणार, अशी भूमिका येथील स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.