छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार ठरला नसल्याने अजूनही निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले नाहीत. अशात महायुतीकडून इच्छुक असलेले मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली आहे. याचवेळी निलेश राणे देखील सागर बंगल्यावर पोहचल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, विनोद पाटील आणि फडणवीसांमध्ये संभाजीनगरच्या लोकसभेच्या जागेबाबत चर्चा झाली असल्याची देखील माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे फडणवीसांच्या भेटीबरोबरच विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतली आहे.
विनोद पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, आर.आर.पाटील फाऊंडेशन आणि अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान या दोन्ही संस्थाचे ते अध्यक्ष आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या मध्य विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती. तर औरंगाबाद- जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत प्रवेशासाठी साकडे घातले होते. परंतु पाटील यांनी नकार दिला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर भाजप नेते भागवत कराड, अतुल सावे, भाजपचे अनेक पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगरसाठी आग्रही मागणी केली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा भाजपला सुटणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. त्यामुळे आता विनोद पाटील यांना छत्रपती संभाजीनगरमधून जागा मिळते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी आंदोलन आणि उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर ठाम आहेत. त्यासंदर्भात भूमिका ठरवण्यासाठी शुक्रवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा मंदिर मंगल कार्यालयात बोलावलेल्या बैठकीतच तुंबळ हाणामारी झाली. उमेदवारी मलाच मिळावी, अशी मागणी विकीराजे भोकरे पाटील, अशोक मोरे व गणेश उगले पाटील यांनी केली.
