आचारसंहिता उल्लंघनाच्या 79 हजार तक्रारी

आचारसंहितेच्या उल्लंघनाविरोधातील ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅप अत्यंत प्रभावी ठरू लागले असून लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून शुक्रवापर्यंत देशभरातून 79 हजारहून अधिक तक्रारी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदवल्या गेल्या आहेत. आचारसंहिता उल्लंघनाच्या बहुसंख्य तक्रारींचे तातडीने निवारणही करण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने 16 मार्चला देशभरातील लोकसभेची निवडणूक सात टप्प्यांमध्ये होणार असल्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 19 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. मतदानाचा सातवा टप्पा 1 जूनपर्यंत चालणार आहे. 4 जूनला देशभरातील निकाल जाहीर होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून आचारसंहिता उल्लंघनाच्या प्रकारामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपद्वारे 79 हजारहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यापैकी 99 टक्क्यांहून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.

बेकायदेशीर बॅनर होर्डिंगबाबत 58,500 तक्रारी दाखल करण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे, तर 1,400 तक्रारी पैसे, भेटवस्तू आणि दारूच्या वितरणाबाबत आहेत. तीन टक्के तक्रारी मालमत्तेच्या नुकसानीच्या होत्या. गुंडगिरीच्या 535 तक्रारींपैकी 529 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. निषिद्ध कालावधी नंतरच्या प्रचाराशी संबंधित एक हजार तक्रारी होत्या.

‘सी-व्हिजिल’ हे मोबाईल ॲप्लिकेशन आहे ज्यावर नागरिकांना राजकीय गैरवर्तन घटनांच्या तक्रारी करता येतात. मतदान पॅनेलने म्हटले आहे की सीव्हीआयजीआयएल एक प्रभावी साधन बनले आहे आणि निवडणूक पर्यवेक्षण आणि प्रचारातील गोंधळ कमी करण्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण झेप आहे.या अ‍ॅपचा वापर करून नागरिकांना काही मिनिटांत राजकीय गैरव्यवहाराच्या घटनांची त्वरित तक्रार करता येऊ शकते. त्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयात धाव घेण्याची गरज नाही.