प्रणिती शिंदेंचे आरोप शहिदांचे अपमान करणारे; राम सातपुतेंचे जोरदार प्रत्युत्तर

सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रचाराला सुरुवात झाली असून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे आणि भाजपाचे उमेदवार राम सातपुते हे एकमेकांवर आरोपज-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. प्रणिती शिंदे यांनी भाजपावर निशाणा साधताना म्हटले होते की, जेव्हा भाजपकडे काही मुद्दे नसतात, तेव्हा ते काहीतरी घडवतात. मागील निवडणुकीवेळी पुलवामा घडवले, असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला. त्यांच्या या आरोपाला राम सातपुते यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे,सातपुते म्हटले की, प्रणिती शिंदेंच्या आरोपमुळे देशातील शहिदांचा अपमान झाला आहे. कारण भाजपा अशा विषयांमध्ये राजकारण करत नाही.

कॉंग्रेसच्या उमेदवाराला लाज वाटायला पाहिजे, असं म्हणत राम सातपुते म्हणाले, ज्या जवानांनी देशासाठी आपलं रक्त सांडलं. देशाची रक्षा केली. जो हल्ला पाकिस्तानने केला. त्यात आपले जवान शहीद झाले. त्या हल्लाबद्दल भाजपवर आरोप करताय. हा अपमान भाजपचा नाही, निवडणुका येतील जातील, तर तुम्ही देशाशी गद्दारी करत आहात, असा हल्लाबोलही राम सातपुतेंनी केला.

यावेळी राम सातपुते यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर देखील टीका केली. सातपुते म्हणाले सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार अडकलेल्या सोलापूरच्या १२ अतिरेक्यांना त्यांनी वाचवलं. सोलापूरच्या मंगळवेढा या ठिकाणी समाधान अवताडे यांनी घेतलेल्या बैठकीत राम सातपुते बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. राम सातपुते विरुद्ध प्रणिती शिंदे अशी लढत जाहीर झाल्यापासून दोघंही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. माझ्या वडिलांवर टीका करु नका असं म्हणणाऱ्या प्रणिती शिंदेंनाही राम सातपुतेंनी उत्तर दिलं आहे. तुम्ही केवळ माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी आहात म्हणून तुम्हाला तिकिट मिळालं आहे. सोलापूरसाठी तुम्ही काय केलंत? असा प्रश्न राम सातपुतेंनी केला आहे.

महिन्यातून दोन दिवस मतदारसंघात यायचे आणि एकदाच फोटो काढायचा. तोच फोटो तिकडे पंधरा दिवस दाखवत भेटी दिल्याचे दाखवण्याचं काम ताईने केले आहे. असले धंदे मी करीत नाही अशा शब्दात त्यांनी प्रणिती शिंदे याना टोला लगावला. आजवर ७५ वर्षात कोणी हिंदूंना आतंकवादी म्हणायचे धाडस केले नव्हते, ते या सुशीलकुमार शिंदे यांनी केले. ते सोलापूरचे कलंक असल्याचा घाणाघातही आमदार राम सातपुते यांनी केला.

काँग्रेस उमेदवाराची मानसिकताचं तुष्टीकरणाची आहे, दृष्टीकरण करायचे आणि प्रसंगी देशाशी गद्दारी करायची ही यांची मानसिकता आहे. ही निवडणूक मी सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. सोलापूरचा चारी बाजूने विकास झाला पाहिजे ही माझी भूमिका असल्याचं राम सातपुते म्हणाले.