राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईत येणार असून देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या आरबीआयच्या स्थापनेला नव्वद वर्षे पूर्ण होत असल्यानं बँकेच्या मुख्यालयात मोठा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमाचे थेट लाईव्ह प्रक्षेपण आरबीआयच्या सोशल मीडिया अकाउंटवरून करण्यात येणार आहे. मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मोदींचा हा चौथा दौरा आहे.
याआधी नरेंद्र मोदी अटल सेतूच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुंबईत आले होते. यावेळी त्यांनी ३० हजार कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन केले होते. त्याआधी मोदी हे नाशिकमध्ये राष्ट्रीय युवा महोत्सवाला हजर राहिले होते. त्यानंतर ते सोलापूरच्या दौऱ्यावरही येऊन गेले. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी २८ फेब्रुवारी रोजी यवतमाळ दौरा केला होता. यवतमाळ-नागपूर मार्गावरील भारी येथे आयोजित महिला बचत गटाच्या कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मोदींच्या हस्ते नमो शेतकरी योजनेचे दोन हप्ते वितरीत करण्यात आले होते.
त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे पैसे देखील मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक १ एप्रिल २०२४ रोजी ९० व्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, नरिमन पॉइंट, मुंबई येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकची (आरबीआय) १९३५ साली स्थापना झाली. या बँकेच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान आहे. आरबीयची स्थापना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन आणि इट्स सोल्यूशन’वरून करण्यात आली. डॉ. बाबासाहेब यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनिमिक्समध्ये पीएचडी मिळविली होती. रुपयाचं अवमूल्यनं, आर्थिक इतिहास या विषयावरडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पीएचडी मिळाली होती. त्यांनी अर्थतज्ज्ञ म्हणून भारतीय रुपयाबाबत काही शिफारसी पुस्तकातून केल्या होत्या.
