गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाला निवडणुकीत यश दुर्मिळ झाले आहे. 2014 पासून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी खालवत चालली आहे. मध्य प्रदेश, राजस्थानसारखे राज्य काँग्रेसने गमावले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे असले तरी गांधी परिवाराचे पक्षावर वर्चस्व आहे. सोनिया गांधी प्रकृतीच्या कारणामुळे पक्षाचे कामकाज पाहत नाही. यामुळे राहुल गांधी यांच्यावरच पक्षाची जबाबदारी आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्राही काढली होती. आता येत्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना यश मिळाले नाही तर त्यांनी पक्षातून बाजूला व्हायला हवं, असा सल्ला निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिला आहे.
प्रशांत किशोर यांनी म्हटले की, राहुल गांधी हिंदी पट्ट्यात निवडणूक जिंकू शकत नाहीत. तर वायनाडमधून जिंकल्याचा काहीच फायदा नाही. काँग्रेसची लढाई मुख्यरित्या उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश सारख्या हिंदी भाषिक राज्यात आहे. मात्र त्यांचे नेते मणिपूर आणि मेघालयाचे दौरे करतात. केवळ केरळमध्ये जिंकून देशात विजय मिळवता येत नाही. राहुल गांधी यांनी अमेठी सोडणे देशातील जनतेला चुकीचा संदेश दिल्यासारखे आहे. प्रशांत किशोर यांनी पंतप्रधान मोदींचे उदाहरण देत म्हटले की, पीएम मोदी 2024मध्ये गुजरातसोबतच उत्तर प्रदेशमधूनही निवडणूक लढले होते.
गेल्या 10 वर्षांत काँग्रेस पक्षाची वाताहात झालेली असतानाही राहुल गांधींनी पक्षाची सूत्रे दुसऱ्याच्या हाती दिली नाहीत. हे लोकशाहीविरोधी आहे, असं प्रशांत किशोर म्हणाले. प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षाला पुन्हा जीवनदान देण्याच्या हेतून रणनीती आखली होती. पण धोरणावरुन मतभेद झाल्यानंतर ते बाहेर पडले होते. “जेव्हा तुम्ही गेल्या 10 वर्षांपासून एकच काम करत असता आणि त्यात यश मिळत नसतं तेव्हा ब्रेक घेण्यात काही चुकीचं नाही. पुढील 5 वर्षं इतर कोणाला तरी संधी देण्यात हरकत नाही. तुमच्या आईने केलं आहे,” अशी आठवण त्यांनी करुन दिली. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर सोनिया गांधींनी राजकारणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि 1991 मध्ये पी व्ही नरसिंह राव यांच्याकडे पदभार सोपवला होता.
“काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांना निर्णय प्रक्रियेत अडथळे येतात. कारण त्यांना अगदी किरकोळ बाबींसाठीही राहुल गांधींकडून परवानगी घ्यावी लागते”, असंही ते म्हणाले. “निवडणूक आयोग, न्यायव्यवस्था आणि प्रसारमाध्यमं यांसारख्या यंत्रणांमुळे पक्षाला अडचण निर्माण झाली आहे, असं राहुल गांधी म्हणतात. मात्र, त्यांच्या या दाव्यात काहीच तथ्य नसल्याचंही प्रशांत किशोर म्हणाले. तर, काँग्रेसमधील अंतर्गत संरचनात्मक समस्याही काँग्रेसच्या घसरत्या कामगिरीत महत्त्वाची भूमिका बजावतात, असं प्रशांत किशोर म्हणाले.
