मागील काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाची जे काही चरितचर्वण सुरु आहे, त्यावरुन दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडी करत असल्याचे दिसून येते. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ, अशी धमकीची भाषा केली जाते आहे. मुळातच महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचे यातून दिसून येते, असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वंचितला सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असताना काँग्रेसचा वंचितला प्रस्ताव म्हणजे वरातीमागून घोडे असेच आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले की, वंचिककडून राज्यातील उर्वरित मतदारसंघातील जागांचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसात जाहीर केला जाईल.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रकाश आंबेडकर यांना अजूनही वेळ गेलेली नाही. त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे, असे आवाहन केले होते. तसेच ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांनीही आंबेडकर यांना आघाडीसोबत येण्याचे आवाहन केले होते. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी पटोले यांचा प्रस्ताव अमान्य असल्याचे म्हटले. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची खासदारकी आणि केंद्रात मंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या बातम्या येत आहेत. पण राज्यसभा खासदारकीचा कोणताही प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही, असेही ते म्हणाले.
अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये रिपब्लिनक सेनेचे आनंदराज आंबेडकरांनी पुन्हा एकदा निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. या आधी आनंदराज आंबेडकरांनी निवडणुकीतून माघार घेणार असल्याची घोषणा केली होती. तो निर्णय आता बदलण्यात आला आहे. वंचित बहुजन आघाडीने अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा जाहीर केला आहे.
