संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार; संजय निरुपम यांचा गौप्यस्फोट

करोना काळात मुंबई महानगरपालिकेने गरीब कामगारांना खिचडी वाटप करण्यासंदर्भात उपक्रम सुरू केला होता. मात्र, ठाकरे गटाच्या नेत्यांनाच या खिचडी वाटपाचे कंत्राट दिले गेले. तसेच या घोटाळ्यात संजय राऊत यांनाही दलाली देण्यात आली, तेच या घोटाळ्याचे खरे सुत्रधार आहेत, असा दावा काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी केला आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी यासंदर्भातील आरोप केले.

राजकारणात कधीही कुटुंबाला खेचू नये. पण घोटाळा ज्याप्रकारे झाला आहे, त्यात त्यांचा उल्लेख करावा लागत आहे. संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आहेत. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पकडले गेल्यानंतर त्यांनी पत्नीच्या नावे लाच घेतल्याचे समोर आले होते. त्यांनी पत्नीला मधे आणायला नको होते. खिचडी घोटाळ्यात त्यांनी मुलगी, भाऊ आणि आपल्या पार्टनरच्या नावे पैसे घेतले आहेत, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, हा सगळा खिचडी घोटाळा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आहे. त्यामुळे ईडीने आपल्या तपासाचं जाळं वाढवून सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीने केलेल्या घोटाळ्यासाठी संजय राऊतांना अटक करावी. असेही ते म्हणाले.

सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीत राजीव साळुखे, सुजीत पाटकर हे संजय राऊतांचे पार्टनर आहेत. कोविडमध्ये त्या कंपनीला 6 कोटी 37 लाखांची खिचडी पुरवण्याचं कंत्राट मिळालं होतं. या कंपनीतून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंब, मित्रांनी 1 कोटी रुपये दलाली म्हणून घेतले. बँकेतील खात्यातून मुलीच्या नावे संजय राऊतांनी चेकने लाच घेतली. 29 मे 2020 रोजी 3 लाख 50 हजार रुपये खात्यात आले होते. 26 जून 2020 रोजी 5 लाख रुपये मिळतात. 6 ऑगस्टला 1 लाख 25 हजार, 20 ऑगस्टला 3 लाखांचा एक चेक येतो. याचदरम्यान संजय राऊतांचे सख्खे भाऊ संदीप राऊत यांच्या खात्यावर 6 ऑगस्टला 5 लाखांचा चेक मिळाला,असा दावा संजय निरुपम यांनी केला आहे

माझी अशी मागणी आहे की, ईडी जी चौकशी करत आहे, त्याचे स्वरुप व्यापक करावे आणि अमोल कीर्तिकर यांच्यासोबत सह्याद्री रिफ्रेशमेंटने जे घोटाळे केले आहेत, त्या घोटाळ्यासंदर्भात संजय राऊत यांना अटक करावी. कारण ते या घोटाळ्याचे मुख्यसूत्रधार आहेत. त्यांनी कुटुंबाच्या नावावर कमिशन खाल्लं. चोरी केली आहे, असे निरुपम यांनी म्हटले आहे.