सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याने काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी फेरविचार करण्याचा सल्ला महाविकास आघाडीला दिला असतानाच आता कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशाल पाटील यांना काँग्रेसकडून लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यामुळे सांगली काँग्रेसमध्ये पहिली वादाची ठिणगी पडली आहे. मिरज तालुका काँग्रेस कमिटी आजपासून बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन सांगलीची जागा ही ठाकरे गटासाठी सोडण्यात आल्याचं जाहीर केलं. तर ठाकरे गटाच्या कोल्हापूरच्या जागेवर काँग्रेसकडून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जात आहे. त्यामुळे या दोन जागांची आदलाबदल झाल्याची निश्चित करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं. असं असलं तरीही सांगलीतील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.
विशाल पाटील यांना लोकसभेची उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहे. आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव केला. त्यानंतर सांगलीमध्ये देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस शब्द पुसून टाकला.सांगलीतील काँग्रेस भवनच्या इमारतीवरील काँग्रेस या शब्दाला रंग लावत काँग्रेस शब्द कार्यकर्त्यांनी पुसून टाकला. सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी असं काँग्रेस भवनच्या इमारतीवर उल्लेख होता. संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमका घेत काँग्रेस शब्द पुसून टाकला.
गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली लोकसभेसाठी काँग्रेसच्या गोटातून तयारी करत असलेल्या विशाल पाटील यांना ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीने झटका बसला आहे. ही जागा काँग्रेसच्या पदरात पडावी यासाठी वारंवार दिल्ली दौरे सुरू होते मात्र तरीही ही जागा ठाकरे गटाकडे गेली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि महाविकास आघाडीसमोरच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे.
सांगली जिल्ह्यात काँग्रेसचं नाव घ्यायचं नाही, अशी भूमिका आता काँग्रेस कार्यकर्ते घेत आहेत. या घडामोडींनंतर आता विशाल पाटील अपक्ष लढण्याच्या तयारीत आहेत का? अशा चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्याच्या काँग्रेस नेत्यांनी अजूनही ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेली नाही.
