महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळीचा फटका; गारपीट अन् अवकाळीने पीकांचं मोठं नुकसान

राज्यात सध्या संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. शहरांच्या कमाल तापमानात घट होत असतानाच, काही ठिकाणी अवकाळी पावसाचं सकट कायम आहे. त्यामध्ये हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यामध्ये संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठं नुकसान झाले आहे.

मराठवाड्यातील ब-याच भागात गेल्या ३ दिवसांपासून कुठे ना कुठे वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडत आहे. गुरुवारी दुपारनंतर परभणी, लातूर, बीडसह हिंगोली, नांदेड आदी भागात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. परभणी जिल्ह्यात तर अवकाळी पावसादरम्यान वीज पडून दोघांचा बळी गेला तर एक बैल आणि शेळीही दगावली. लातूर शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. औसा तालुक्यात तर वादळी वा-यासह गारपीट झाल्याने उन्हाळी पिके, फळझाडांची हानी झाली. बीड जिल्ह्यातही गारपीट झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना पुन्हा अवकाळी पावसाने दणका दिला. त्याचा फटका उन्हाळी धानासोबतच भाजीपाला व फळपिकांना बसला आहे. यवतमाळ जिल्ह्यात दोन दिवसांच्या पावसाने दोन हजार हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामध्ये सर्वाधिक ६३८.१७ हेक्‍टर नुकसान एकट्या बाभूळगाव तालुक्‍यातील आहे. गोंदिया, नागपूर जिल्ह्यांत पावसाने पुन्हा हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यात मोठी गारपीट झाल्याने १२ हजार हेक्टरवरील पिकांना फटका बसला.

हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं दिलेल्या माहितीनुसार पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, तर, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान इथं ताशी ३०-४० किमी वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता आहे.