बंगळुरुतील रामेश्वर कॅफे स्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दोन फरार आरोपीना अटक केली आहे. कोलकाताजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. 1 मार्चला झालेल्या या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते. राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मुसावीर हुसेन शाजीब याने रामेश्वरम कॅफेमध्ये आयईडी ठेवला होता आणि अदबुल मतीन ताहा हा स्फोटाच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा मास्टरमाईंड होता. या स्फोटात 9 लोक जखमी झाले होते.
अदबुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब यांचा कोलकाताजवळील त्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यांना पकडण्यात एनआयए टीमला यश आलं. आपली ओळख लपवून ते कोलकाताजवळ वास्तव्य करत होते असं एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.एनआयएने दोन वॉण्टेड आरोपींवर प्रत्येकी 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे.
यापूर्वी तपास यंत्रणेने 23 मार्च रोजी दोन संशयितांची ओळख पटवली होती. फरार आरोपी ताहा तामिळनाडूचे पोलीस निरीक्षक के विल्सन यांच्या हत्येप्रकरणी वाँटेड होता आणि तो मुख्य संशयित आरोपीसोबत चेन्नईत राहत होता. एनआयएच्या म्हणण्यानुसार, शाजिब आणि ताहा दोघेही आयएसआय मॉड्यूलचा भाग आहेत. यापूर्वी अटक करण्यात आलेल्या मॉड्यूलच्या सदस्यांनीही याची पुष्टी केली होती.एनआयएने आजूबाजूच्या परिसरातील हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून मुख्य आरोपीची ओळख पटवली होती. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ताहा नेहमी टोपी घालत असे, जी त्याने चेन्नईमध्ये असताना खरेदी केली होती. स्फोटाच्या दिवशी संशयित हल्लेखोर शाजिबने हीच टोपी घातलेली दिसली होती. या टोपीच्या केवळ 400 नगांचीच विक्री झाल्याचे तपासणीत आढळून आले.
तपासादरम्यान ताहाने हा कट यशस्वी करण्यासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर केल्याचं समोर आलं. ताहाने 1 मार्चच्या कॅफे स्फोटासाठी लॉजिस्टिकची व्यवस्था करण्यासाठी क्रिप्टोकरन्सी मुझम्मील शरीफला हस्तांतरित करण्यासाठी भारताच्या विविध भागांमध्ये चोरलेल्या ओळखी आणि आयएसआयएस कारणांसाठी भरती केलेल्या लोकांच्या ओळखपत्रांसह विविध साधनांचा वापर केला होता असंही अधिकाऱ्याने सांगितलं.
रामेश्वरम कॅफेमध्ये 1मार्चला बॉम्बस्फोट झाला होता. 3 मार्चला या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. बंगळुरुच्या व्हाइटफिल्ड एरियामध्ये हा कॅफे आहे. या स्फोटात अनेकजण जखमी झाले होते. दुपारी लंचच्यावेळी हा स्फोट झाला होता.
