ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (दि.12) पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवाय तुम्ही दहा वर्षात काय केलं ते सांगा मी अडीच वर्षात काय केलं ते सांगतो, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले,उद्धव ठाकरे तुम्ही आमच्याशी विकासावर चर्चा करू नका.जर आम्ही नुसतं नितीन गडकरींनी केलेल्या विकासकामांची यादी सांगितली. तरी तुम्हाला चार-पाच पेले कोमट पाणी प्यायची वेळ येईल. त्यामुळे तुम्ही नुसते टोमणे मारत बसा. टोमणे मारल्यामुळे तुम्हाला मतं तर मिळणार नाहीत. मात्र तुमच्या मनाचं समाधान नक्कीच होईल असा चिमटाही फडणवीसांनी यावेळी ठाकरेंना काढला.
अडीच वर्ष उद्धव ठाकरे होते. फेसबुक लाईव्ह करायचं अन् कोमट पाणी प्या म्हणायचं याशिवाय यांनी काहीच केलं नाही. नागपूर उपराजधानीचं शहर, यात देखील ते आले नाहीत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे, आमच्या नागपूरचा एखादा प्रवक्तादेखील स्टेजवर उभा राहिला, तर तुमच्याकडे सांगायला १० कामं नाहीत,असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना टोला लगावला.
