कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत हे लवकरच कळेल; नीलम गोऱ्हे यांची उद्धव ठाकरेंवर टीका

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. हे चार जूनला सिद्ध होणार आहे, असं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांचा प्रचंड ज्ञानी आहेत, मी त्यापुढे सामान्य कार्यकर्ता आहे. त्यामुळे कुठलं उत्तर न देणे हे महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचं आहे, असं म्हणत त्यांनी खासदार संजय राऊतांनाही लक्ष्य केलं आहे.

नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की, उद्धव ठाकरेंच्या मनात प्रचंड द्वेष आहे. त्या संतापाच्या भरात ते बोलत असतात. जामिनावरील लोकांचं काय मत आहे. हे चार जूनला सिद्ध होणार आहे. कोणाचे दिवस आलेत आणि कोणाचे दिवस भरलेत, हे लवकरच कळेल. राजकीय दृष्ट्या जनाधार संपला, एवढं मात्र उद्धव ठाकरे यांच्या लक्षात येईल, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

भावना गवळी यांच्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “उमेदवारी गेल्यावर भावना गवळी यांना वाईट वाटणं स्वाभाविक आहे. भावनाताईंचं कार्य दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना सामावून घेऊ, असं मुख्यमंत्री यांनी सांगितलेल आहे. मुख्यमंत्री ते स्वतःचा शब्द लगेचच पाळतात. यावर लवकरच चांगल्या प्रकारे मार्ग निघू शकेल. भावनाताईंना सोबत घेऊनच पुढे जाणार आहोत. रवींद्र वायकर यांच्यासंदर्भात काही भाकीत करणे म्हणजे रस्त्यावर बसलेल्या ज्योतिषी प्रमाणे काही तरी सांगण्यासारखे आहे. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. शिंदे साहेब त्यावर निर्णय घेतील.” अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली.

नीलम गोऱ्हे यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं आहे की, प्रत्येक पक्ष हे काम करतच असतात. राहुल गांधींनी त्यांनी केलेलं वचन, जाहीरनामे आणि निवेदन आणि मनमोहन सिंहाच्या काळातील निर्णयाचे कागद फाडून टाकले होते. तसे स्वतःच्या खासदारांचे निर्णय ते फाडून टाकणार नाही याचे उत्तर पहिले त्यांनी द्यावे. रश्मी बर्वे प्रकरणांमध्ये जे काही निर्णय घेतलेले आहे, त्याबद्दलची सहानुभूती मिळून उलट महिला मतदारांची लोकप्रतिनिधींची ही जबाबदारी आहे.