भाजपच्या मोठ्या नेत्यांना जेलमध्ये टाकण्याचा मविआचा प्लॅन होता; एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याची योजना आखली गेली होती, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत केला. मुंबईतील तीन जागांसह शिवसेना राज्यात १६ जागा लढवणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं. जागावाटपावरून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करून ४२ जागा जिंकण्याचा २०१९ चा विक्रम मोडित काढू, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

यावेळी शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला की, उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोणत्या मुद्द्यावरून ठिणगी पडली? त्यावर शिंदे म्हणाले, मला वर्षा बंगल्यावर बोलावलं गेलं आणि तास वाट पाहायला लावली. हे नेहमीच व्हायचं. दोन वर्षे हे सातत्याने होत होतं. अखेर, राज्यसभा निवडणुकीवेळी मला चर्चेपासून दूर ठेवण्यात आलं. माझ्याकडून नगरविकास खातंदेखील काढून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मला नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्यानंतरही मला झेड प्लस सुरक्षा दिली गेली नाही. अशा अनेक गोष्टी घडत होत्या.

सध्या आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा विषयाची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा पुढे आणला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले होते, असा दावा केला होता. त्याला फडणवीस यांनी मुख्यमंत्री लांब साधे मंत्री देखील आदित्यला करणार नाही, असे उत्तर दिले. आता त्यावर एकनाथ शिंदे यांनीही मत व्यक्त केले आहे. माझ्याकडे नगरविकास खाते होते. परंतु माझ्या खात्यात कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप होत होता.

शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावाचा प्रस्ताव दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी नाकारलं. याउलट उद्धव ठाकरे यांनी आपल्याला तुम्हाला मुख्यमंत्री करु असं सांगितलं असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. “जेव्हा महाविकास आघाडी सरकार तयार होत होतं, तेव्ही मी मुख्यमंत्री होण्याची आशा असल्याने माझ्या पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. पण नंतर मला शरद पवारांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंचं नाव सुचवलं असल्याचं सांगण्यात आलं. पण शरद पवारांनी नंतर मला स्पष्टीकरण देत शिवसेनेने उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यासाठी लोकांना पाठवलं होतं असं सांगितलं. म्हणजेच उद्धव ठाकरेंचं नाव सुचवण्यासाठी शरद पवारांना त्यांनीच सांगितलं होतं”.

सेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांना तिकिट नाकारण्यात आले याविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, उमेदवार बदलणे ही पक्षाची अंतर्गत बाब होती. भाजपने आम्हाला उमेदवार बदलण्यास सांगण्याचा प्रश्नच येत नाही. शिवसेनेचा राज्यात 16 जागा लढवण्याचा मानस असून, मुंबईत तीन जागा आहेत.