राज्यातील वातावरणात बदल; कुठे उष्णतेची लाट तर कुठे अवकाळी पावसाची शक्यता

राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात आणि मुंबईत उन्हाच्या झळा अधिक लागणार आहे. तर दुसरीकडे काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रामुख्याने आज विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबई, कोकण किनारपट्टीच्या भागात उष्णतेच्या झळा बसणार आहे. अरबी समुद्रावरुन आर्द्रतायुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्याने २५ एप्रिलपर्यंत उकाडा जाणवणार आहे.

पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अरबी समुद्रावरून बाष्पयुक्त उष्ण वारे किनारपट्टीवर येत असल्याने पुढील काही दिवस किनारपट्टीच्या भागात तापमान वाढणार आहे. आद्रता वाढल्यामुळे असह्य उकाडयाचा सामना करावा लागण्याचा अंदाज आहे. पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील तापमानात घट झाली असून उत्तर कोकणात तापमानात काहीशी घट होईल. तर मुंबईपासून दक्षिणेकडे असणाऱ्या किनारपट्टीवर वाढत्या तापमान घट होण्याची शक्यता आहे.

विदर्भात रविवारी पारा सरासरी ४० अंशांवर होता. वाशिममध्ये राज्यातील सर्वाधिक ४३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला रविवारी उकाडयापासून काहीसा दिलासा मिळाला. कमाल तापमानात एक ते दीड अंशांनी घट होऊन सरासरी कमाल तापमान ३९ अंशांवर आले होते. किनारपट्टीवर सरासरी तापमान ३३ अंशांवर राहिले. मुंबईत ३२.२ तर डहाणूत ३४.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे.

दरम्यान, राज्यात एकिकडे अवकाळी पाऊस पडत असताना दुसरीकडे कोकणासह मुंबई, ठाण्यात हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. परिणामी वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे नागरिक हैरणा झाले आहेत. उष्णतेच्या लाटेमुळे आजार तर वाढतातच पण जीवाला धोकाही वाढतो. उष्णतेची लाट म्हणजे जी माणसांबरोबरच प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण करते. उष्णतेची लाट हा अत्यंत उष्ण हवामानाचा काळ असतो. जे सहसा दोन किंवा अधिक दिवस टिकते. जेव्हा कोणत्याही भागात तापमान सामान्यपेक्षा जास्त पोहोचते तेव्हा तेथे गरम वारे वाहू लागतात, ज्याला उष्णतेची लाट किंवा सामान्य भाषेत उष्णतेची लाट म्हणतात. पृथ्वीचे हवामान जसजसे उष्ण होत चालले आहे तसतसे दिवस आणि रात्रही उष्ण होत आहेत आणि उष्णतेच्या लाटांचा प्रादुर्भाव वाढत आहे.