सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान संपले आहे. या काळात मतदानाची टक्केवारी कमी राहिल्याने निवडणूक आयोग चिंतेत आहे. या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेच्या संभाव्य धोक्याचा सामना करण्यासाठी निवडणूक आयोगाने हवामान विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली आहे.
कडक उन्हाळा आणि उष्णतेच्या लाटांमध्येच होत असलेली लोकसभा निवडणूक २०२४ लक्षात घेता निवडणूक आयोगाने सोमवारी एका टास्क फोर्सची स्थापना केली. ही समिती उन्हामुळे निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करेल. या टास्क फोर्समध्ये निवडणूक आयोग, भारतीय हवामान विभाग, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभाग आणि आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा समावेश असेल.
दक्षिण आणि मध्य भारतामध्ये मार्चमध्ये तापमान ३४ ते ४० अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले होते. मात्र, एप्रिलमध्ये ते वाढून ३४ ते ४० अंशाच्या दरम्यान असेल. एप्रिलमध्ये दोन वेळा उष्णतेची लाट येऊ शकेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पुढील सहा टप्प्यांमधील मतदानावर वाढत्या तापमानाचा विपरित परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन आयोगाने सोमवारी हवामान खात्यातील अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.
निवडणूक आयोगाने सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना उष्णतेशी संबंधित कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक मदत देण्यासाठी पूर्णपणे तयार राहण्याचे निर्देश दिले आहेत. निवारागृहे आणि मतदान केंद्रांवर पाण्याची उपलब्धता यासह मतदारांच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी पुरेशा तरतुदी केल्या जातील. याशिवाय विविध उपाययोजनांची माहिती जनतेला देण्यासाठी जनसूचना अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात मतदार, निवडणूक कर्मचारी आणि अधिकारी यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे.
हवामान खाते केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात असून हंगामी अंदाजासह दरमहा, दरआठवडा व दररोज अशा तीन प्रकारच्या अंदाजांची माहिती दिली जात आहे. मतदान होत असलेल्या भागांतील तपशीलवार माहिती, उष्णतेची लाट आणि आद्र्रता पातळी आदीचे अंदाजही दिले जात आहेत, असे हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी बैठकीनंतर सांगितले.
या महिन्यात उष्णतेची लाट येण्याची दुसरी वेळ आहे. पहिल्या भागात ओडिशा, झारखंड, गांगेय पश्चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि गुजरातच्या काही भागांमध्ये जबरदस्त उन्हाची लाट आली होती. अल निनोची कमकुवत स्थितीदरम्यान हवामान विभागाने आधी एप्रिल ते जून या कालावधीदरम्यान अधिकाधिक उष्णतेचा इशारा दिला होता.
