राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह बहाल केलं होतं. त्यानुसार लोकसभा निवडणुकीला शरद पवारांचा पक्ष तुतारी फुंकण्याच्या तयारीत आहे. बारामतीत विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून त्या तुतारी चिन्हावर लढत आहेत. परंतु सोहेल शेख नावाच्या व्यक्तीनेही बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला असून त्यालाही ‘तुतारी’ नावाचं चिन्हच बहाल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.नावात साम्य असलं, तरी चिन्हाचं स्वरुप वेगळं आहे.
‘ट्रम्पेट’चा अर्थ मराठीत ‘तुतारी’ असा होत नाही. त्यामुळे तो शब्द बदलून दुसरा प्रतिशब्द द्यावा, अशी मागणी बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे सोमवारी केली. त्यासाठी त्यांनी हरकतीचा अर्जही दाखल केला.सुळे यांच्या पक्षाला निवडणूक आयोगाने तुतारी फुंकणारा माणूस’ असे निवडणूक चिन्ह दिले आहे. मात्र याच मतदारसंघात अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांना निवडणूक आयोगाने ‘ट्रम्पेट’चे चिन्ह दिले आहे. त्याला मराठीत ‘तुतारी’ असा शब्द दिला आहे. त्याला खाबिया यांनी आक्षेप घेतला आहे. दोन्ही चिन्हांच्या नावांमध्ये साधर्म्य आहे. त्यामुळे मतदारांचा गोंधळ उडू शकतो.
सोमवारी (ता. 22 एप्रिल) 38 उमेदवार हे निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे निश्चित झाल्यानंतर अपेक्षा उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात आले. यामध्ये अपक्ष उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांनी पसंतीच्या चिन्हामध्ये तुतारी या चिन्हाला प्रथम प्राधान्य देत या चिन्हाची मागणी केली. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून देखील शेख यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आले. परंतु, यांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. याबाबत आक्षेप घेणारा मेल शरद पवारांच्या पक्षाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आला आहे.
