शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षात पहिल्यांदा बदललं; अजित पवारांनी हक्काचे मैदान घेतले

देशभरात येत्या ७ तारखेला लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघात सुद्धा तिसऱ्या टप्प्याच मतदान होणार आहे. दरम्यान, या लोकसभा मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत होणार आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या जरी निवडणुकीच्या रिंगणात असल्या तरी खरी लढाई ही बारामतीमध्ये अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी आहे. आज सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा ही बारामती मधील मिशन हायस्कुलच्या मैदानात पार पडत आहेत. या सभेची तयारी सुरु आहे. तर शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान ५० वर्षांत पहिल्यांदा बदललं आहे. बारामतीतील मिशन बंगल्याचे मैदान यंदा अजित पवारांना मिळालंय. लोकसभा, विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती किंवा नगर परिषदेची निवडणूक असो शरद पवार याच मैदानावर नेहमी सभा घेतात. मात्र यंदा हे मैदान अजित पवारांनी आधीच आरक्षित केले आहे.

बारामतीचे राजकारण १९६७ पासून शरद पवार यांच्याभोवती फिरते आहे. शरद पवार यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केल्यापासून त्यांच्या किंवा त्यांच्या त्या त्या वेळच्या पक्षाच्या उमेदवाराची सांगता सभा बारामतीतील मिशन बंगला येथे होत आली आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर मिशन बंगल्याचे मैदान यंदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिळविले आहे. त्यामुळे शरद पवार यंदा त्या मैदानावर दिसणार नाहीत. त्याऐवजी मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टा येथे पवार हे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सांगता सभा घेणार आहेत.

शरद पवार यांच्याकडून नेहमीच बारामतीमधील मिशन बंगल्यानजीकच्या मैदानावर सांगता सभा घेत प्रचाराची सांगता केली आहे. अजित पवार गटाने यापूर्वीच हे मैदान आरक्षित केले. परिणामी, शरद पवार गटाला सांगता सभा अन्यत्र घ्यावी लागत आहे. ५० वर्षांत प्रथमच शरद पवार या मैदानावर सांगता सभा घेणार नाहीत. आता हे दोन्ही मातबर नेते रविवारी बारामतीत आपापल्या पक्षाची सांगता सभा घेत असून, त्यामध्ये ते बारामतीकरांना काय आवाहन करणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बारामतीची निवडणूक यंदा पहिल्या दिवसापासून रंगतदार होती. आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी आणि घराणेशाहीवर यंदा बारामतील प्रचार पार पडला. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यात तगडी लढत आहे. नणंद- भावजय अशी जरी ही निवडणूक असली तरीही पवार विरुद्ध पवार अशी लढाई आहे. शरद पवार आणि अजित पवार या दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची असणार आहे आणि या निवडणुकीमुळे राजकीय गणितं बदलण्याची शक्यता आहे. आता शरद पवारांचं सभेचं मैदान अजित पवारांनी आधीच सभेसाठी काबीज केलं आहे. त्यामुळे लेकीसाठी घेत असलेल्या सभेत शरद पवार नेमकं काय बोलणार?, अजित पवार म्हटल्याप्रमाणे लोकांना भावनिक आवाहन करणार की रोखठोक भाषण करणार हे पाहावं लागणार आहे.