जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीचे ठिकाण म्हणजेच किरणा दुकान असते. गल्ली-बोळात ही दुकाने असतात. किरणा दुकानातून रोज आवश्यक असणाऱ्या सर्वच गोष्टी मिळतात. परंतु किरणा दुकानात ड्रग्स मिळणार का? चक्क एका दुकानदाराने हा उद्योग सुरु केला. या प्रकरणात पोलिसांनी राजेशकुमार प्रेमचंद तिवारी याला अटक केली आहे. तसेच तिवारी याला ड्रग्सचा पुरवठा करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे. किरणा दुकानातून 4 कोटी 50 लाख 70 हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला आहे.
उल्हासनगर शहरातील हिल लाईन पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका किराणा दुकानातून कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने साडेचार कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्स जप्त केले असून ड्रग्स डीलर दुकानदारालाही अटक करण्यात आली आहे. तर, या घटनेमागील मास्टरमाईंड मुख्य ड्रग्स डीलर अद्यापही फरार आहे. दरम्यान, पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती देण्यात आली.
अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील गायत्री किराणा दुकानांमध्ये मोफेड्रॉन एमडी हा अंमली पदार्थ बेकायदेशीररित्या विक्री करत असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रँचला खबऱ्याकडून समजली. त्यानंतर, कल्याण क्राईम ब्रँचने तत्काळ या किराणा दुकानात धाड टाकत 3 किलो एमडी जप्त केले, या एमडी ड्रग्जची किंमत 4 कोटी 52 लाख 29 हजार रुपये एवढी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.गेल्या काही महिन्यांपासून मुंबईसह उपगनगरातील अंमली पदार्थांच्या घटनांमुळे तरुणाई कोणत्या दिशेला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, विशेषत: एमडी मोफेड्रॉन ड्रग्ज जप्त केलं जात आहे.
