शरद पवार यांनी पुलोदचा प्रयोग केला, त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, हा त्यांचा इतिहास आहे. तसेच, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत दोन पक्ष संपणार असल्याचे भाकित केले, त्यावरून विलीनीकरण होणार हे लक्षात आले असेलच. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
बावनकुळे म्हणाले, निवडणुकीमध्ये इलेक्टोरल बॉन्डमधून मिळालेले पैसे वाटले जात आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता, त्यावर बावनकुळे यांनी टीका करत चव्हाण यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आहे. बॉन्डमधून मिळालेल्या पैशाचा हिशेब प्राप्तीकर विभागाला द्यावा लागतो. निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे उद्योग हे काँग्रेसचेच आहेत. बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे व्हिडीओ व्हायरल करणे, तक्रारी करणे हा विरोधकांचा नियोजित कट होता अशी टीका बावनकुळे यांनी केली.
कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत, या निर्णयाचे स्वागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबाबत आचारसंहितेत निर्णय घेता येतात, त्यामुळे आचारसंहिता भंग झालेला नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत आल्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दुखावले आहेत. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले.
