मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहे. मुंबईच्या दादरमधील शिवाजी पार्कमध्ये भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं असून या सभेत राज ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही या सभेत जनतेला संबोधित करणार आहे. पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची मुंबईत सांगता सभा होणार आहे. यासाठी मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा मुंबईत रोड शो देखील होईल.
प्रचाराकरता शिवाजी पार्कवर 17 मे रोजी सभा घेण्यासाठी मनसे व ठाकरे गट या दोघांनीही अर्ज केले होते. मात्र, ठाकरे गटाला मागे सारत शिवाजी पार्कसाठी मनसेने बाजी मारली आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत.मनसेने महायुतीच्या प्रचारासाठी 17 मे ला शिवतीर्थावर जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, निवडणूक जाहीर झाली त्यावेळी सर्वप्रथम आमचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी परवानगीसाठी पत्र दिलं होतं. महापालिका व निवडणूक आयोगाचा नियम आहे की, ज्याची मागणी पहिली असते त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं, त्याप्रमाणे आम्हाला सभेची परवानगी मिळाली आहे.
तिसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी राज ठाकरे यांनी कणकवलीत भाजप उमेदवार नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सभेला संबोधित केलं होतं. आता 10 मे रोजी पुण्यात आणि 12 मे रोजी ठाणे जिल्ह्यात राज ठाकरे यांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतील लोकसभेच्या जागांसाठी 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्याआधी, 17 मे रोजी संध्याकाळी दादरच्या शिवाजी पार्कमध्ये महायुतीच्या प्रचाराची सांगता सभा होईल. शिवाजी पार्क मैदानाच्या मंचावरून राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार असल्याची माहिती मनसेचे सरचिटणीस वागीश सारस्वत यांनी दिली आहे.
