विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात नागपुरातील सीताबर्डी पोलीस स्थानकात अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शुक्रवारी (10 मे) रात्री उशिरा हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ‘शहीद हेमंत करकरे यांच्या शरिरात घुसलेली गोळी ही कसाबच्या किंवा कुठल्याही दहशतवाद्याच्या बंदुकीतील नव्हती,’ असं विजय वडेट्टीवार म्हणाले होते.यानंतर विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली होती. लोकप्रतिनिधी कायदा अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“तक्रार ही निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवली. आम्ही फक्त चौकशी करायला सांगितली. स्थानिक पातळीवर चौकशी करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचाच अर्थ जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत कारवाई ही झाली आहे. केस फाईल करणारे निवडणूक आयोगाशी संबंधित अधिकारी असतील. निवडणूक यंत्रणेमार्फत केस फाईल करण्यात आली आहे”, अशी माहिती निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली. याच तक्रारीच्या संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडेट्टीवार यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी विजय वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या हत्याप्रकरणी वादग्रस्त वक्तव्य करत हेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल संशय व्यक्त केला होता. तसेच त्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप यांच्या बद्दलही आरोप केले होते. त्यानंतर भाजपच्या विधी सेलने वडेट्टीवार असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग करत असून समाजात तेढ निर्माण करत आहे अशी तक्रार निवडणूक आयोगाकडे केली होती.
