राज्यात पुढील काही दिवस पावसाचे आहेत. १५ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह वीजांचा कडकडाट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे, सातारा, चंद्रपूर, यवतमाळ, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना पुढील काही दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम जिल्ह्यांना १५ मे पर्यंत यलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा, ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार असून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
पुणे आणि आजूबाजूच्या गावात काल संध्याकाळी चारच्या सुमारास वादळी वाऱ्याच्या पावसाने झोडपलं आहे. या पावसामुळे पुणेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पुण्यात लोकसभेच्या निवडणुकींचं वारं सुरु आहे. त्यामुळे सभांचा धडाका सुरु आहे. मात्र या पावसामुळे कालच्या काही सभावर पाणी फेरल्याचं पाहायला मिळालं. आजदेखील पुण्यात अनेक राजकीय नेत्यांच्या सभा आणि रोड शो हणार आहेत. संध्याकाळी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे. त्यापूर्वी जर पुण्याला पावसानं झोडपलं तर सभा आणि रोड शो रद्द होण्याची शक्यता आहे. पुण्यात मतदानाच्या दिवशीदेखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे शुक्रवारी राज्यातील सहा जिल्हेवगळता अन्यत्र पारा चाळिशीच्या आत राहिला. अकोल्यात सर्वाधिक ४२.५, अमरावती ४०.६, वाशिम ४१.२, वर्धा ४१, यवतमाळ ४०, बीड ४०.३ आणि मालेगावात ४१.० अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्याच्या अन्य भागात कमाल तापमान चाळीश अंशांच्या आत होते.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाचा मुक्काम वाढला आहे. १६ मे पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस राहणार असल्याची माहिती पंजाबराव डख यांनी दिली आहे. त्यामुळं या अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, राज्यात काही ठिकाणी पडत असलेल्या अवकाळी पावसामुळं शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे.
