“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांना ऑफर दिली नाही. हा सल्ला आहे. मोदी म्हणाले बारामतीच्या निवडणुकीनंतर पवारांच्या लक्षात आलं की बारामतीची सीट अजित पवारांकडे चाललीय. तेव्हा शरद पवारांनी सांगितलं की ४ जूननंतर क्षेत्रीय पक्ष काँग्रेसमध्ये विलिन होतील. त्यामुळे निवडणुकीचा निकाल पवारांना समजतोय. त्यापुढे नरेंद्र मोदी असं म्हणाले की काँग्रेस हे बुडतं जहाज आहे. काँग्रेसमध्ये जाऊनही तुम्ही वाचू शकणार नाही. त्यापेक्षा शरद पवारांनी अजित पवारांनी आणि उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वात यावं, तर तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण होतील. याचा अर्थ ऑफ होत नाही. याचा अर्थ सल्ला होतो. त्यांना सल्ला दिलाय”, असं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं.
भारतीय जनता पार्टीने सत्तेत राहण्यासाठी पक्ष फोडले, घरे फोडली अशी टीका विरोधकांकडून केली जाते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे.आम्ही घर फोडत नाही आणि पक्षही फोडत नाही. फक्त संधी मिळाली तर ती सोडत नाही. जे सोबत येवू इच्छितात त्यांना सोबत घेतो, असे ते यावेळी म्हणाले. मशिदीत मोठ मोठे स्क्रीन लावून कुणाला मतदान करा आणि करू नका सांगितलं जात आहे. हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय. शरद पवार आणि गांधींचा काय संबंध ? असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्रातील सस्टेनेबल शहर म्हणून आम्ही करत आहोत. महागाई, गद्दारी या नॅरेटिव्हने निवडणुका जिंकता येत नाही. आमच्या विरोधकांच्या भाषणामध्ये 1 टक्के पण विकासाचे मुद्दे नसतात. गद्दार आणि खुद्दारवर निवडणुका जिंकता येत नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत विरोधकांवर टोलेबाजी केली. ते म्हणाले, पुण्याच्या विकासासाठी पुरंदर विमानतळ खूप महत्वाचं आहे ते आम्ही करणार. महाराष्ट्रात 45 चा नारा आम्ही दिला आहे. आम्ही कोणत्या तीन जागांचा विचार सोडलाय हे आमच्या नेत्यांना विचारून सांगतो. पण आम्ही बारामती जिंकणारच, असे त्यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल अंतरिम जामिनावर बाहेर आले आहेत. बाहेर आले म्हणून त्यांचं स्वागत सत्कार होताहेत. त्यांनी असं काय चांगलं काम केलं? असा प्रश्न फडणवीसांनी विचारला. मोदींची शरद पवारांना ऑफर ही बातमी चुकीची आहे. ती ऑफर नाही, तर तो सल्ला आहे. शरद पवार बारामती हरणार आहेत असे ते म्हणाले.
‘शिवसेनेची ही परिस्थिती का आली, घराणेशाहीमुळे आली. राष्ट्रवादीची ही परिस्थिती का आली, ती कुटुंबाला प्राधान्य यामुळे आली. त्या ठिकाणी शेवटी अजित पवारांनी हा पक्ष शरद पवारांसोबत उभा केला. जमिनीवर अजित पवारांनी पक्ष उभा केला. आमदार देखील अजित पवारांच्या पाठिशी होते. अशा परिस्थिती अजित पवारांना डावललं गेलं. प्रत्येक वेळी त्यांना समोर आणून व्हिलन केलं जायचं. त्यामुळे अजित पवारांनी अस्तित्वाचा विचार केल्यामुळे त्यांनी निर्णय घेतला, असे फडणवीस म्हणाले.
