8 किलो सोने, 14 कोटी रोख, नांदेडमध्ये आयकर विभागाचा छापा; तब्बल 170 कोटींची मालमत्ता जप्त

गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभागाकडून अनेक ठिकाणी कारवाया केल्या जात आहेत. शुक्रवारी नांदेडमध्येही या विभागाने एक मोठी कारवाई केली. येथील संजय भंडारी नावाच्या फायनान्स व्यापाऱ्याच्या मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला. या कारवाईत प्राप्तिकर विभागाने तब्बल 170 कोटीची बेहिशोभी मालामत्ता जप्त केली आहे. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे.

आयकर विभागाने शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे दोन कार्यालय, तसच कोठारी कॉम्प्लेक्स मधील कार्यालय, आदिनाथ पतसंस्था आणि पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले. तीन दिवस आयकर विभागाने झाडाझडती घेतली. या छाप्यात आयकर विभागाला जवळपास 170 कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता भंडारी कुटुंबाकडे सापडली होती. यात तब्बल 8 किलो सोने आणि 14 कोटी रुपयांची रोकड आहे. सोमवारी भंडारी कुटुंबाच्या बँकेतील लॉकर ची तपासणी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार प्राप्तिकर विभागाने शुक्रवारी शहरातील शिवाजीनगर परिसरात एकूण सहा ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये संजय भंडारी यांच्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थान यावरदेखील छापेमारी करण्यात आली. ही कारवाई करण्यासाठी 25 वाहनांत साधारण 60 पेक्षा अधिक अधिकारी आले होते. या पथकात पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड, परभणी इत्यादी शहरातील प्राप्तिकर विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश होता. कित्येक तास छापेमारीची ही कारवाई चालू होती.

आयकर विभागाने जप्त केलेली 14 कोटी रुपयांची रोकड मोजण्यासाठी तब्बल 14 तास लागले होते. तसंच, आयकर विभागाला काही दस्तावेजदेखील हाती लागले आहेत. तेदेखील जप्त करण्यात आले आहे. सलग तीन दिवस ही कारवाई सुरू होती. आता या प्रकरणी सखोलपणे चौकशी सुरू आहे. एव्हढ्या मोठ्या संख्येने आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई सुरू केल्याने नांदेड शहरात खळबळ उडाली आहे.