विधान परिषदेच्या शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लांबणीवर; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे. यानंतर राजकीय वर्तुळाला थोडा ब्रेक लागण्याची शक्यता असतानाच महाराष्ट्रातील चार जागांसाठी विधान परिषद निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या. १० जूनला यासाठी मतदान होणार होते. त्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडलं होतं. मात्र, निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयानुसार, या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

शिक्षक आमदारकीची निवडणूक 10 जूनला जाहीर झाल्यामुळे लोकसभेची निवडणूक ड्यूटी आटोपून सुट्टीवर जाणाऱ्या शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडले होते. अखेर आनंदाची बातमी आली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर कार्यक्रम तूर्त मागे घेतला आहे. शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी आमदार कपिल पाटील यांच्या सोबत दिल्लीत जाऊन भारत निर्वाचन आयोगाकडे मागणी केली होती तर हायकोर्टात याचिकाही केली होती.

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर त्यावर शिक्षक, पदवीधर संघटनांनी आक्षेप नोंदवला होता. तसेच, या संघटनांनी निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती की, “शाळांना सुट्टी असल्यामुळे त्याचा परिणाम थेट निवडणुकीवर होईल. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर निवडणुका घेण्यात याव्यात” या मागणीच्या आधारावरच आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सध्या विलास पोतनीस हे मुबंई पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. कोकणात निरंजन डावखरे हे विद्यामान आमदार आहेत. यासह नाशिकच्या शिक्षक मतदार संघावर किशोरे दराडे विद्यमान आमदार आहेत. तसेच, कपिल पाटील हे मुंबई शिक्षक मतदारसंघात विद्यमान आमदार आहेत. या सर्वांचा विधान परिषदेचा कार्यकाळ 7 जुलै 2024 रोजी संपणार आहे. यामुळेच निवडणूक आयोगाने या चार जागांसाठी निवडणुकीची घोषणा केली होती.