महादेव बेटिंग ॲप प्रकरणी पुण्यात मोठी कारवाई, 70 ते 80 जणांना घेतलं ताब्यात

महादेव बेटिंग अॅप प्रकरणी पुण्यातील नारायणगावमध्ये पोलीसांनी छापेमारी केली आहे. परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारी नंतर महादेव ऑनलाइन बेटिंग अॅपची कामं पुण्याच्या नारायणगावामधून सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर पुणे ग्रामीण पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची नारायणगाव येथे छापेमारी केलीय. नारायणगावातील एका इमारतीत या काम सुरू असून या प्रकरणात 70 ते 80 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

भारतासह परदेशात महादेव बेटिंग एप प्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची पाळेमुळे महाराष्ट्रात पुण्यातील नारायणगाव इथंपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय. नारायणगाव शहरातल्या एका इमारतीत महादेव बेटिंग एपचं काम सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केलीय.पोलिसांनी नारायणगाव शहरातील इमारतीत छापा टाकला असून 70 ते 80 जणांना ताब्यात घेतलंय. संबंधितांची चौकशी केली जात असून यात आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सध्या नारायणगाव पोलीस स्टेशनमध्ये तपास सुरू आहे.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात 28 एप्रिलला बॉलिवूड अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलीस सायबर सेलच्या विशेष तपास पथकाने ही कारवाई केली आहे. साहिल खान द लाय बूक अ‍ॅपशी जोडलेला होता, जे एक सट्टेबाजी अ‍ॅप असून महादेव बेटिंगच्या नेटवर्कचा भाग आहे. छत्तीसगढ येथे त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणात अनेक अभिनेत्यांची नावं समोर आली असून, आता यात साहिल खानचाही समावेश झाला आहे. साहिल खान लोट बुक 24/7 नावाच्या एका सट्टेबाजी अ‍ॅप वेबसाईटमध्ये भागीदार आहे, जे महादेव बेटिंग अ‍ॅप नेटवर्कचा भाग आहे. साहिल खानवर लायन बूकला प्रमोट करण्याचा आणि त्यांच्या कार्यक्रमांना हजेरी लावल्याचा आरोप आहे. लायन बूकला प्रमोट केल्यानंतर त्याने भागीदार म्हणून लोटस बूक 24/7 अ‍ॅप लाँच केलं होतं. साहिल अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी आपल्या प्रसिद्धीचा वापर करत होता. तो सेलिब्रिटीजला आमंत्रित करुन ग्रँड पार्टी करायचा.