राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वारे आणि मुसळधार पाऊस बरसताना दिसला आहे. त्यानंतर तुरळक ठिकाणी पाऊस सोडला तर उर्वरित राज्यात उष्णतेचे वातावरण आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसही राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा वीजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो.

यामध्ये पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उन्हाळ्यामुळे देशातील बहुतेक भागात नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक शहरात ४० अंशापेक्षा जास्त तापमान असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. यामुळे लोक आतुरतेने मान्सूनची वाट पाहत आहे.

मुंबईकर पुन्हा उकड्याने हैराण झाले आहे. सकाळ पासून असलेल्या उष्ण व दमट हवामानामुळे मुंबईकर त्रस्त झाले आहेत. मुंबईत बुधवारी ३७. ६ तर सांताक्रूझ येथे ३७.२ ऐवढ्या तापमानाची नोंद झाली. हवामान विभागाने मुंबईसह कोकण, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातही आज उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कोकणात देखील मोठ्या प्रमाणात तापमान वाढले आहे. काही तुरळक ठिकाणी पाऊस पडला असून तात्पुरता दिलासा नागरिकांना मिळाला होता. मात्र, त्यांना आता पुन्हा उन्हाच्या तडाख्याला सामोरे जावे लागत आहे. अलिबाग येथे ३७.७, रत्‍नागिरी येथे ३६, पणजी येथे ३४.७, तर डहाणू येथे ३७.५ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

जागतिक स्तरावर एल-निनो फॅक्टरमुळे जगभरात एप्रिल महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले आहे. एप्रिल महिना आजपर्यंतचा सर्वात उष्ण एप्रिल महिना ठरला आहे. जगभरात सलग 11 महिने तापमानवाढीचा कल कायम राहिला असून जागतिक तापमान ससरासरीपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. परिणामी उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र आणि असह्य झाल्या आहेत. दक्षिण अमेरिकेने आजवरचा सर्वाधिक उष्ण एप्रिल अनुभवला तर युरोपात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उष्ण महिना म्हणून एप्रिलची नोंद झाली आहे.