नाशिकमध्ये चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची पोलिसांकडून तपासणी; हेलिपॅडवर उतरताच झाली चेकिंग

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे यांचं हेलिकॉप्टर नाशिक हेलिपॅडवर पोहोचताच पोलिसांनी त्यांच्या बॅगांची तपासणी केली. यामागे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी आहे. एकनाथ शिंदे बॅगांमधून पैसे घेऊन जात असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. दरम्यान यावेळी एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं असून आम्ही आताही बॅग घेऊन आल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी रोड शो करणार आहेत. त्यासाठी एकनाथ शिंदे आज हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आले. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर मुख्यमंत्री पुढे निघून गेले. मात्र, त्यांच्या मागून बॅगा घेऊन येत असलेल्या लोकांना थांबवण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी शिंदे यांनी सोबत आणलेल्या सर्व बॅगा उघडून कसून तपासणी केली.

या बॅगांमध्ये कॅमेराचे साहित्य आणि इतर गोष्टी आढळून आल्या. संजय राऊत यांनी आरोप केल्याप्रमाणे बॅगांमध्ये कोणतेही पैसे आढळून आलेले नाहीत. या बॅगांची तपासणी करताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी रितसर शुटिंगही केले आहे. एकनाथ शिंदे यांनी या कृतीतून अप्रत्यक्षपणे संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊतांनी शेअर केलेला व्हिडीओ नाशिकमधील होता. या व्हिडीओत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेलिकॉप्टरमधून उतरताना दिसत होते. हा व्हिडीओ पोस्ट करताना संजय राऊतांनी लिहिलं होतं की,”नाशिकमध्ये रात्रीस खेळ चाले. नुसता पै पाऊस… दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलिस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झडत्या करत आहे. महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरु आहे”.