मुंबईत सोमवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसात घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळून त्यात १७ जणांचा बळी गेला आहे. १७ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिंडेच्या पोलिसांनी अखेर मुसक्या आवळ्या आहेत. त्याला राजस्थानमधील उदयपूर शहरातून अटक करण्यात आली. दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणातील आरोपी भावेश भिंडे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. होर्डिंग दुर्घटनेच्या घटनेपासून भावेश भिंडे हा फरार होता. पोलीस गेल्या दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होते. अखेर मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी उदयपूर येथून भावेश भिंडेला अटक केली आहे. भावेश भिंडेला आता पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबईत आणलं जाणार आहे. भावेश भिंडेने भाच्याच्या नावाने उदयपूरमध्ये हॉटेल रूम बुक केली होती तिथे तो राहत होता.
भावेश भिंडेचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांची 8 पथकं वेगवेगळ्या ठिकाणी पाठवण्यात आली होती. अखेर राजस्थानच्या उदयपूरमध्ये तो सापडला असून, पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळ्याला गेल्यानंतर भावेश भिंडे दुसऱ्या दिवशी मुंबईत परतला होता. तेथून तो ठाण्याला आणि नंतर अहमदाबादला गेला होता. भावेश भिंडेने सतत आपली ठिकाणं बदलली. उदयपूरला पोहोचल्यानंतर त्याने आपली ओळख लपवली होती. आपलं खोटं नाव सांगत तो एका हॉटेलात लपला होता. मुंबईचे सह पोलीस आयुक्त लखमी गौतम, पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर आणि गुन्हे शाखेच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांच्या पथकांनी त्याचा माग काढला आणि ताब्यात घेतलं.
भावेश भिंडे याच्या विरोधात जानेवारी महिन्यात मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणात त्याच्यावर कोर्टात आरोपपत्र देखील दाखल झालंय. भावेश भिंडे 2009 मध्ये मुलुंड येथून आमदारकीला उभा राहीला होता. त्यावेळी त्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर 23 गुन्हे दाखल झाल्याची माहीती दिली होती. भावेश भिंडे याच्यावर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्ट आणि नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचा चेक बाऊन्सिंग झाल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच होर्डींग्ज बसविताना पालिका आणि रेल्वेचे नियम पायदळी तुडविल्याचे अनेक गुन्हे भिंडे याच्यावर दाखल झालेले आहेत. तसेच झाडांना विष घालून मारल्याचा गुन्हा देखील मुंबई महानगर पालिकेने त्याच्यावर दाखल केला आहे.
भावेश भिंडेवर आधीच 26 गुन्हे दाखल होते. तरीही उजळ माथ्याने तो व्यवहार कसे करत होता.. रेल्वे आणि मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर होर्डिंगबाबत वारंवार आलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं. ताबडतोब कारवाई का केली नाही असे अनेक सवाल या दुर्घटनेच्या निमित्ताने उपस्थित होतायत.
