संविधान बदलण्यासाठी आमच्याकडे 10 वर्षापासून बहुमत आहे पण आम्ही तसा प्रयत्न कधी केला नाही, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान मोदींच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. सोबतच त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही टीका केली. केजरीवालांच्या अंतरिम जामिनाला काही जण विजय समजत आहेत. पण केजरीवाल जिथे जातील तिथे लोकांना मद्य घोटाळा आठवेल, अशी टीका शाहांनी केली. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. केवळ राजकीय स्थैर्यासाठीच 400 जागा हव्यात, असेही ते म्हणाले.
काँग्रेसने भाजपवर संविधान बदलाचा आरोप केला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, गेली १० वर्षे संविधान बदलण्यासाठी आमचे बहुमताचे सरकार आहे. पण आम्ही कधीही तसा प्रयत्न केला नाही. बहुमताचा दुरुपयोग करण्याचा इतिहास हा भाजपचा नाही, तर तो इंदिरा गांधींचा आहे. काँग्रेसच्या आरोपांवर अमित शाहांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपचा 400 पारचा नारा गाजला आहे. पूर्ण बहुमताची दवंडी भाजपने अगोदरच दिली आहे. पण जर बहुमताचा आकडा गाठताना दमछाक झालीच तर भाजपकडे प्लॅन बी आहे का? केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रश्नाला थेट उत्तर दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे प्रचंड बहुमताने निवडून येतील, याची खात्री असल्याचे अमित शाह म्हणाले. जर भाजप बहुमत गाठू शकलं नाही तर, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार आहे का? या प्रश्नाला त्यांनी ‘प्लॅन बी तेव्हाच तयार करतात, जेव्हा प्लन ए यशस्वी होण्याची शक्यता 60 टक्क्यांहून कमी असते.’ असं रोखठोक उत्तर दिलं.
दरम्यान, काहीजण व्हॉट्सअप आणि चॅनेल पाहतात. परंतु आम्ही लाखो किमी दौरे करून कोट्यवधी लोकांसोबत जनसंपर्क करतोय हे कुणाला दिसत नाही. जोपर्यंत भाजपाचा एक तरी खासदार संसदेत आहे तोपर्यंत एससी, एसटी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला कुणीही धक्का लावू शकत नाही. नरेंद्र मोदी यांच्याशिवाय मोठा एससी, एसटी आणि ओबीसींच्या आरक्षणाचा कुणी समर्थक नाही असंही अमित शाहांनी आरक्षण रद्द करण्यावरून झालेल्या आरोपावर भाष्य केले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ओडिशा आणि काश्मीरबाबत मोठं भाकित केलं. ओडिशात सरकार बदलणार असा दावा त्यांनी केला. काश्मीरमध्ये पूर्वी निवडणुकांवर बहिष्कार टाकल्या जायचा. आता काश्मीरमध्ये मतदान होते. पहिल्यांदा 40 टक्के काश्मीर पंडितांनी मतदान केल्याचा दावा यावेळी अमित शाह यांनी केला.
