लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे. देशातील एकूण 6 राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेशात 49 जागांसाठी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रातला हा मतदानाचा शेवटचा टप्पा असेल. मुंबईतील सर्व सहा मतदारसंघ, ठाणे, कल्याण, भिवंडी, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या 13 जागांवर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत.
या टप्प्यात रायबरेली आणि अमेठी या दोन हायप्रोफाईल जागांवरही मतदान होणार आहे, जिथून काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी रिंगणात आहेत. या व्यतिरिक्त केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या भवितव्याचाही या टप्प्यात निर्णय होणार आहे. या फेरीत 4.26 कोटी महिला आणि 5,409 तृतीय लिंग मतदारांसह 8.95 कोटींहून अधिक लोक मतदानासाठी पात्र आहेत. 94,732 मतदान केंद्रांवर 9.47 लाख मतदान अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
राज्यातील ज्या मतदारसंघात निवडणूक होणाराय, त्यामध्ये मुंबईतील 6 तसंच ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी, नाशिक, धुळे, दिंडोरी या मतदारसंघांचा समावेश आहे. पियूष गोयल, भारती पवार, अरविंद सावंत, राहुल शेवाळे, वर्षा गायकवाड, उज्ज्वल निकम, राजन विचारे, श्रीकांत शिंदे, हेमंत गोडसे आदी दिग्गजांचं भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीचा हा अखेरचा टप्पा आहे. या टप्प्यानंतर सर्वांनाच उत्सुकता असेल ती 4 जूनच्या निकालाची.
निवडणूक आयोगाचा महिला सबलीकरणासाठी सखी बुथचं नियोजन केलंय..महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचं मतदान पार पाडलं जाणारे. यासाठी निवडणूक आयोगाने विशेष तयारी केलीये. महिलांसाठी एक विशेष सखी बुथ तयार करण्यात आलायं. यामध्ये बुथ प्रमुखापासून सर्व कर्मचारी वर्ग हा महिलांचा असणारे. या सखी बुथला गुलाबी रंगानं आणि गुलाबी फुलांनी सजवलयं.
शहरी भागातील मतदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाने विविध माध्यमांचा वापर करून अनेक उपक्रम राबवले. त्यातून मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला. तसेच मतदारांना उन्हाचा त्रास होऊ नये, अधिक वेळ रांगेत उभे राहू लागू नये यासाठी यंत्रणनेने विविध सोयी-सुविधांची सज्जता ठेवली आहे. दरम्यान, शहरी भागातील मतदारांनी सोमवारी मोठय़ा प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकिलगम यांनी केले आहे.
