उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भाजप नेते आशिष शेलार यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई भाजपचे अध्यक्षचे आशिष शेलार यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मतदान प्रक्रिया सुरु असतानाच ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत खोटी व दिशाभूल करणारी विधाने केली, असा आरोप भारतीय जनता पक्ष आणि आशिष शेलार यांच्याकडून करण्यात आलाय. सत्ताधारी भाजपावर बिनबुडाचे आरोप करतानाच त्यांनी निवडणूक आयोगावरही आरोप केले आहेत. हे आचारसंहिता उल्लंघन असून यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार मुंबई भाजपा अध्यक्ष ,आमदार आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुंबईत मतदान प्रक्रियेदरम्यान, जाणूनबुजून काही ठिकाणी अडचणी निर्माण केल्या जात आहेत. तसंच, आमच्या लोकांना अडचणी निर्माण केल्या जात आहेत, याबाबत योग्य ती खबरदारी निवडणूक अधिकाऱ्यांकडून घेतली नाही तर आपण न्यायालयात जाऊ. लोकांना त्रास दिला जात असेल तर मतदानासाठी आलेल्या लोकांचं उद्या सकाळी 7 वाजपर्यंत मतदान घेण्याची वेळ आली तरी घावं लागेल. अन्यथा आपण यामध्ये हस्तक्षेप करणार असल्याचा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला होता.

संथ मतदानावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे ठाकरेंना प्रत्युत्तर

मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत.

महाराष्ट्रातील 13 जागांसाठी आज मतदानाचा पाचवा आणि अखेरचा टप्पा पार पडला. निवडणूक आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात रात्री 7 वाजेपर्यंत सरासरी 52.54 % मतदानाची नोंद झालीय. दिंडोरीत सर्वाधिक 61.96% तर सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये 45.67% इतकं झालंय… अनेक ठिकाणी संध्याकाळी ६ नंतर देखील मतदार रांगेत उभे होते. त्यामुळं मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, डॉ. भारती पवार यांच्यासह अरविंद सावंत, वर्षा गायकवाड, डॉ. श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, उज्ज्वल निकम, हेमंत गोडसे, राजन विचारे अशा दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.