कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातातील आलिशान पोर्शे मोटार विनानोंदणी रस्त्यावर धावत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बंगळुरूमध्ये तात्पुरती नोंदणी करून पुण्यात ही मोटार आणण्यात आली होती. त्यानंतर मार्चमध्ये या मोटारीची नोंदणी करण्याची प्रक्रिया पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) सुरू करण्यात आली परंतु, ती अद्याप पूर्ण झालेली नाही.
अपघातातील ही कार बंगळुरू येथून तात्पुरती नोंदणी करून पुण्यात आणली होती. मार्चमध्ये नोंदणीची प्रक्रिया शहरातील आरटीओ कार्यालयात सुरू होती. त्यामुळे इतके दिवस ही कार नोंदणी झालेली नसतानाच रस्त्यावर धावत होती अशी माहिती मिळाली आहे. या निष्काळजीपणामुळे आता प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मागील दोन महिन्यांपासून ही कार रस्त्यांवर धावत आहे तरी पोलिसांच्या कसं लक्षात आलं नाही असा प्रश्न पुणेकरांकडून उपस्थित केला जात आहे.
अल्पवीयन मुलाने कबुली जबाबात काय म्हटलं?
या प्रकरणामध्ये आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने आपला जबाब नोंदवला आहे. वडिलांनीच आपल्याला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं या तरुणाने म्हटलं आहे. “मी कार चालविण्याचे रीतसर प्रशिक्षण घेतलेले नाही. वाहन चालविण्याचा परवानाही माझ्याकडे नाही. तरी वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्शे कार माझ्याकडे दिली. त्यांनीच मला मित्रांसह हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहिती आहे,” असं या अल्पवीयन मुलाने पोलीस चौकशीत सांगितलं आहे. कल्याणीनगर घडलेल्या या पोर्शे कारच्या अपघातात अनिस अवधिया, अश्विनी कोस्टा हे दोघे मृत्युमुखी पडले.
दरम्यान शनिवारी जेव्हा हा अपघात घडला त्याच्या काही काळ आधी तो अल्पवयीन आरोपी आणि त्याचे मित्र पुण्यातील प्रसिद्ध पबमध्ये गेले होते. तेथील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. सुमारे ३० सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये एका टेबलवर ४-५ लोक बसलेले दिसत आहेत. समोरच्या टेबलवर अनेक ग्लास, दारूच्या बाटल्या आणि इतरही अनेक ड्रिंक्स ठेवलेली दिसत आहेत. थोड्या वेळाने ती लोकं उठून बाहेर जातना दिसतात.
