बिहारमधील जनसुराज पक्षाचे संयोजक आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर (पीके) यांनी केंद्रात पुन्हा एनडीएचे सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला. आपल्या चुकीचे परिणाम विरोधकांना भोगावे लागू शकतात, असे त्यांनी सांगितले. केंद्रातील भाजप दक्षिण आणि पूर्व भारतात आपल्या जागा आणि मतांमध्ये अभूतपूर्व वाढ नोंदवेल, असा अंदाज प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.
प्रशांत किशोर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केलाय की केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल जनतेमध्ये कोणताही मोठा असंतोष नाही किंवा पर्यायाची कोणतीही जोरदार मागणी नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणू शकतात. त्यांनी भाकीत केले की भाजपला 2019 ला 303 जागा मिळाल्या होत्या. तितक्याच जागा किंवा त्याहून अधिक काही जागा भाजपला मिळू शकतात.असं प्रशांत किशोर म्हणाले.
प्रशांत किशोर म्हणाले की, मला वाटते की मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत येऊ शकते. त्यांना गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या तितक्याच जागा किंवा त्यापेक्षा किंचित चांगली कामगिरी भाजप करू शकेल. आपण मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्याचे सरकार आणि त्यांच्या नेत्याविरुद्ध राग असेल, तर पर्याय काहीही असला तरी लोक त्यांना मत देण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता आहे.
वेगवेगळ्या विचारसरणीचे दोन पक्ष निवडणूक लढवीत असताना काही भांडण होणार हे स्पष्ट आहे. परंतु, मूलभूतपणे मला असे काहीही दिसत नाही की, कोणतेही मोठे आश्चर्यकारक उलटफेर होईल.एनडीएचा आकडा कमी होणार आहे. मात्र, भाजपला 300 हून अधिक जागा मिळताना दिसत आहेत. जे लोक म्हणतात की, भाजप हारत आहे, त्यांनी सांगावे की भाजप किती आणि कोणत्या जागा गमावत आहे.असा प्रश्न प्रशांत किशोर यांनी विचारला आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, गेल्या तीन ते चार महिन्यापासून भाजपची 370 आणि 400 च्या पुढे चर्चा सुरू आहे. ही भाजपची रणनीती किंवा विरोधकांचा कमकुवतपणा समजा, पण भाजपने आपले लक्ष्य 272 वरून 370 पर्यंत वाढवले आहे. याचा फायदा भाजपला झाला. त्यामुळे नरेंद्र मोदी या निवडणुकीत हरतील ही चर्चाच झाली नाही. फक्त भाजप 370 जागा मिळवणार की त्यापेक्षा कमी-जास्त मिळवणार याचीच चर्चा झाल्याचं दिसतंय.
