गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुण्यातील हायप्रोफाईल अपघातावर वेगवान घडामोडी घडत आहेत. हे प्रकरण पुणे पोलीस आयुक्तांनी गंभीरतेने घेतल्याचं सांगत याप्रकरणी पबचालक व आरोपी वेंदात अग्रवालचे वडिल विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे पोलीस आयुक्तालय गाठत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी सर्व घटनेची माहिती जाणून घेतली. तसेच पोलिसांकडून काय-काय कारवाई करण्यात आली, याचीदेखील माहिती देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणावरुन पोलिसांवर होत असलेल्या आरोपांचं खंडन केलं. याउलट बाल न्याय मंडळाने दिलेल्या निकालावर देवेंद्र फडणवीस यांनी आश्चर्य व्यक्त केलं. बाल न्याय मंडळाचा निकाल हा धक्कादायक होता, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. विशेष म्हणजे यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काही दारुचे दुकान आणि पबवर कारवाई करण्याबाबतचे मोठे संकेत दिले.
दोन जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले. घडलेली ही घटना गंभीर असून, आतापर्यंत काय घडले पुढची कारवाई काय याबाबत चर्चा झाल्याचे फडवीसांनी सांगितले. या घटनेत पोलिसांनी 304 कलम लावले असून, बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. बाल न्याय मंडळाने केलेली कारवाई आमच्यासाठी धक्कादायक असून, आम्ही सुधारित आदेशाची अपेक्षा करत आहोत. तसे न झाल्यास पोलील उच्च न्यायालयात दाद मागतील. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.
पोलिसांनी हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेतले आहे. कारवाई सुरु असून त्यात निश्चित न्याय मिळेल, असे ते म्हणाले. नवीन लायसन्स देताना त्याचे नियम काटेकोर असावेत. स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ नये, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह विरोधातील कारवाई तीव्र करणार आहोत. पोलीस याबाबत कठोर कारवाई करतील. बारमध्ये जाणाऱ्या मुलांचे डॉक्युमेंट तपासले जाणार आहेत. बाहेर सीसीटीव्ही लावले जातील, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. नाकाबंदी करुन असे प्रकार टाळले जातील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, याप्रकरणी अंडर एजला दारू सर्व्ह केल्याने पहिल्यांदा संबंधित पबरवर कारवाई केली असून चौघांना अटक करण्यात आली आहे. तर, मुलगा अज्ञात असतानाही मुलाला बिना नंबर प्लेटची गाडी दिल्याने वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणास पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे, हे सहज सोडून दिले जाणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील अपघात प्रकरणावर गृह विभागाची भूमिका स्पष्ट केली.
