नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा; नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी भाजपला सोपवलं समर्थन पत्र

लोकसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापनेचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अनुषंगाने काल (बुधवारी दुपारी 4 वाजता) एनडीएची पहिली बैठक पंतप्रधानांच्या निवासस्थानी झाली. तासभर चाललेल्या बैठकीत मोदींची एनडीएचे नेते म्हणून निवड करण्यात आली.

या बैठकीला 16 पक्षांचे 21 नेते उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार, एनडीएच्या खासदारांची 7 जूनला बैठक होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत ते राष्ट्रपतींकडे सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. राजनाथ सिंह, अमित शहा आणि जेपी नड्डा यांना सर्व मित्रपक्षांशी वन टू वन बोलण्याची आणि नवीन सरकारच्या स्वरूपावर चर्चा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये एनडीए आघाडीला 292 जागा मिळाल्या आणि बहुमताचा आकडा पार केला. दुसरीकडे विरोधी पक्ष इंडिया आघाडील 234 जागा मिळाल्या आहेत. एनडीएमध्ये 240 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतकं संख्याबळ त्यांच्याकडे नाही. त्यामुळे एनडीएच्या नेतृत्वाखाली आता मोदींना सत्ता स्थापन करावी लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेस 99 जागांसह इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. तर समाजवादी पक्षाला 37 तर टीएमसीला 29 जागा मिळाल्या आहेत.

लोकसभेचा संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर एनडीएच्या विजयी खासदारांची व प्रमुख नेत्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्याचप्रमाणे इंडिया आघाडीच्या नेत्यांनीही दिल्लीमध्ये बैठक आयोजित केली होती. इंडिया आघाडीच्या नेत्यांनी नितीश कुमारांशी संपर्क साधल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. त्यामुळे एनडीएच्या सत्तास्थापनेत अडचण निर्माण होणार की काय , अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

दरम्यान, बहुमत मिळाल्यानंतर एनडीएची राजधानी दिल्लीमध्ये पहिली बैठक संपन्न झाली. या बैठकीत १६ घटक पक्षांनी भाजपला समर्थन पत्र सोपवलं आहे. शिवाय नितीस कुमार व चंद्राबाबू नायडू यांनीही भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी आपलं पाठिंब्याचं पत्र सोपवलं आहे. या निर्णयामुळे नरेंद्र मोदी आणि भाजपला मोठा दिलासा मिळाला असून नरेंद्र मोदींचा तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.