निकालानंतर युगेंद्र पवार यांचा पहिला बळी; बारामतीत पराभवानंतर उपमख्यमंत्री अजित पवारांचा पहिला मोठा निर्णय

बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरुन बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन युगेंद्र पवार यांची उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ⁠बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची नुकतीच बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला उपस्थित न राहिल्याचे कारण कुस्तीगीर परिषदेकडून पुढे करण्यात आले आहे. यावर आता युगेंद्र पवार आणि शरद पवार गट काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

याप्रकरणात युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मला काही सांगता येणार नाही. काही लोकांनी मला पण सांगितलं की परवा कुठेतरी एक मीटिंग झाली. पण माझ्या कानावर आले पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चैनल कडून काय अजून माझ्याकडून काय पत्र किंवा असं काय आलेलं नाही. तीन-चार वर्षांपासून कुस्ती संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली. त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते. चांगलं काम केलंय. तिथले पैलवान चांगली कामगिरी करत आहेत. त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो. दादांनी पण तिथे खूप मदत केली आहे. दादांनी पण तिथं आम्हाला इमारतीला मदत केली. त्यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळाले.

बारामती लोकसभेच्या मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांनी माळेगाव येथील अजित पवारांच्या घरी भेट दिली होती. त्यावेळी अजितदादा घरात नव्हते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्यांची भेट घेतली होती. या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी लोकसभा प्रचारादरम्यान पवार कुटुंबात निर्माण झालेली कटुता कमी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता अजित पवार यांनी युगेंद्र पवारांना कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन हटवल्याने हा वाद चिघळणार का, हे पाहावे लागेल. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजीव आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन केले होते.