विशेष प्रतिनिधी
मुंबई : एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुड न्यूज दिली आहे. भविष्यात मोठी भरती करण्यात येणार आहे. युपीएससी प्रमाणे एमपीएससी परीक्षेमध्ये देखील वेळापत्रक पाळले जाईल असे त्यांनी सांगितले. ( Good news from the Chief Minister for MPSC students, big recruitment, exam calendar like UPSC)
आमदार शिवाजीराव गर्जेंकडून विधिमंडळात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या प्रश्नाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. भविष्यात एमपीएससीमार्फत मोठी भरती करण्यात येणार असून युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील वेळापत्रक पाळले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.
युपीएससी प्रमाणे एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर (वेळापत्रक) असावे, असा आपला प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी सांगितले
एमपीएससी परीक्षा या वर्षापासून वर्णनात्मक स्वरुपात घेणार आहोत. अर्थातच, या प्रक्रियेला काहींचा विरोध आहे, मात्र आपण हा विरोध ग्राह्य धरणार नाही, या शब्दात फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली.
एमपीएससी मंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत, त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर, उर्वरीत दोन जागांसंदर्भात जाहिरात दिली जाणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
राज्यातील अभियांत्रिकी आणि कृषी विषयक तांत्रिक पदांच्या परीक्षा मराठीमध्ये घेतल्या जात नसल्याचे सांगत अभियांत्रिकी विषयांची पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध नसल्याने या परीक्षा इंग्रजी भाषेत घेतल्या जातात. पण आता लोकसेवा आयोगातील अभियांत्रिकी पदांसाठी होणाऱ्या परीक्षा मराठीत होणार आहेत. अभियांत्रिकी पदांच्या अभ्यासक्रमांची पुस्तकेही मराठीत उपलब्ध होणार असून इतर सर्व तांत्रिक पदांच्या स्पर्धा परीक्षा ही मराठीमध्ये घेण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
सगळ्या राज्यांचा आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशात वर्ग ए दोन आणि तीन देखील आपण एमपीएससीला दिलेलं आहे. त्यातूनच, आपण एमपीएससीचं रिस्ट्रक्चरिंग करत आहोत. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे, अशात आपण त्यांच्यासोबत बोलणी करुन, त्यांचं ऐकून काही गोष्टी करतोय, अशी माहितीही देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.
