मालेगाव : मुस्लिम संघटनांकडून विरोध झाल्याने माजी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचा मालेगाव दौरा रद्द झाला आहे. मालेगावात होणाऱ्या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर उपस्थित राहणार होत्या. या कार्यक्रमात त्यांना हिंदूवीर पुरस्कार दिला जाणार होता. ( Sadhvi Pragya Singh Thakur’s Malegaon visit cancelled due to opposition from Muslim organisations)
2008 मध्ये मालेगावात मोठा बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटामध्ये आरोपी म्हणून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर मोठा वाद झाला होता.
साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर मालेगावच्या दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर मुस्लीम संघटनांकडून याला विरोध करण्यात आला. रमजानचा महिना सुरू असल्याने साध्वी यांच्या या दौऱ्याला विरोध करण्यात आला. मुस्लीम संघटनांचा हा विरोध पाहून संत संमेलन कार्यक्रमाचे आयोजक उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने काही अटींवर साध्वी प्रज्ञासिंह यांना मालेगावात जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार, दुपारी 2 वाजता त्यांच्या कार्यक्रमाची वेळ होती. हा कार्यक्रम 5 वाजेपर्यंत संपविण्यात यावा, असेही सांगण्यात आले होते. साध्वींना या कार्यक्रमात कोणतेही प्रक्षोभक भाषण न करावे, अशी सुद्धा अट घालण्यात आली होती. अट मान्य करूनच संत संमेलन कार्यक्रमात मान्यता देण्यात आली होती.
साध्वी प्रज्ञासिंह यांनी स्वतःहूनच या कार्यक्रमाला गैरहजेरी लावली असावी, अशी माहिती समोर आली आहे. कारण दुपारपर्यंत त्या महाराष्ट्रात पोहोचल्या नव्हत्या. आयोजकांना मात्र साध्वी प्रज्ञासिंह कार्यक्रमाला येतील, अशी अपेक्षा होती. पण त्या आल्या नाहीत.
