विशेष प्रतिनिधी
नांदेड : वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी ट्रैक्टर ट्रॉली विहिरीत पडून झालेल्या दुर्घटनेतील मुलगा कृष्णा राऊत याच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. ( Chief Minister Devendra Fadnavis took responsibility for the education of orphan Krishna Raut)
नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता एक दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत वसमत तालुक्यातील गुंज त.आसेगाव येथील ९ महिला व एक पुरुष शेतमजूर आलेगाव शिवारातील शेत गट क्र.२०१ मध्ये शेती कामासाठी जात होते. शेताजवळ आले असता पाण्याने भरलेल्या विहिरीत हे शेतमजूर ट्रॅक्टरसह पडल्यामुळे त्यातील ७ महिलांचा मृत्यू झाला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दुर्घटनेतीलकुटुंबांच्या पाठीशी उभे राहिले. त्यातील एका मयत महिलेचा मुलगा कृष्णा तुकाराम राऊत याचा समाज माध्यमांवरील व्हिडीओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहिला असता, त्यांनी व्हिडीओची तात्काळ दखल घेतली. त्या व्हिडीओमधील लहान मुलाची वेदना व भावना समजून घेत मुख्यमंत्र्यांनी कृष्णाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वतः घेत असल्याचे जाहीर केले. तसेच मयतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लक्ष रुपयाची आर्थिक मदतही जाहीर केली आहे.
तसेच आज शनिवारी (दि.५) रोजी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी दिलेल्या निर्देशानुसार वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांनी मौजे गुंज त. आसेगाव येथील मयतांच्या वारस, नातेवाईकांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे सांत्वन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहचवल्या. त्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, घरकुल योजने अंतर्गत घरकुल योजनेचे लाभ, पुरवठा विभागातील शिधापत्रिका व स्वस्त धान्याबाबतचे लाभ, शिक्षणाशी संबंधित विविध प्रमाणपत्रांचे लाभ, व इतर अनुषंगीक प्राथमिक गरजा पूर्ण करणारे लाभ मिळवून देण्याबाबतची सर्व माहिती मयतांच्या वारसांना अथवा नातेवाईकांना जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांकडून देण्यात आली.
तहसीलदार दळवी यांच्याकडून दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना शासकीय योजनेचे लाभ देण्याच्या उद्देशाने उद्या रविवार (दि.६) रोजी गुंज त. आसेगाव येथे विशेष सहाय्य योजनेच्या शिबाराचे आयोजन ही करण्यात आलेले आहे. त्यामध्ये निवासी नायब तहसीलदार वसमत, मंडळ अधिकारी, विभाग गिरगाव व ग्राम महसूल अधिकारी, पळसगाव त. माळवटा यांना आदेश देण्यात आले आहेत.
