विशेष प्रतिनिधी
वाराणसी : भारताच्या संस्कृती आणि आस्थेचे प्रतीक असलेल्या वाराणसी नगरीत जे घडले ते संपूर्ण देशाला हादरवून गेले. १९ वर्षीय विद्यार्थिनीवर २३ नराधमांनी केलेल्या अमानुष अत्याचाराने संपूर्ण समाजमन सुन्न झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः पुढाकार घेत या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आणि अत्यंत कठोर शब्दांत तातडीने कारवाईचे आदेश दिले. ( Kanyabhoomi Varanasi shaken Prime Minister Narendra Modi uneasyorders immediate action on gangrape case)
शुक्रवारी सकाळी वाराणसीला पोहोचताच पंतप्रधान मोदींच्या चेहऱ्यावर खिन्नतेची छटा दिसून आली. बाबतपूर विमानतळावरच त्यांनी पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना बोलावून घेतले. गँगरेप प्रकरणाची प्रत्येक पायरीवरची माहिती घेतली. त्यांच्या आवाजात संताप होता, आणि मनात एकच निर्धार होता की या पाशवी कृत्याला कोणतीही क्षमा नाही.
“अशा विकृत मानसिकतेला दडपून टाकले पाहिजे. दोषींवर इतकी कठोर कारवाई झाली पाहिजे की ती इतरांसाठी धडा ठरेल,” अशा शब्दांत मोदींनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. याचवेळी त्यांनी भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये म्हणून प्रभावी उपाययोजना करण्याचेही आदेश दिले.
वाराणसीच्या पांडेपूर परिसरातील ही युवती क्रिडा महाविद्यालयात प्रवेश घेण्याची स्वप्ने उराशी बाळगून चालली होती. पण राज विश्वकर्मा नावाच्या ओळखीच्या मित्राने तिचा विश्वासघात केला आणि ती २३ नराधमांच्या विकृतीची बळी ठरली. तब्बल सहा दिवस तिच्यावर पाशवी अत्याचार होत राहिले, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये, एका पाठोपाठ एक बलात्कार झाले.
या दुर्दैवी घटनेनंतर तिच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून १२ आरोपींची नावे स्पष्ट झाली. तत्काळ पोलिसांनी १० जणांना अटक केली. उर्वरित आरोपींचा शोध जोरात सुरु आहे.
पंतप्रधान मोदी यांचं वाराणसी मतदारसंघाशी असलेलं आत्मीय नातं सर्वश्रुत आहे. परंतु, या घटनेत त्यांनी एका पित्याप्रमाणे संवेदना व्यक्त करत या मुलीच्या न्यायासाठी उभं राहण्याची भूमिका घेतली आहे. त्यांच्या या तातडीच्या आणि ठाम निर्णयामुळे सर्व स्तरांवरून पंतप्रधानांच्या या हस्तक्षेपाचे स्वागत होत आहे.
द वाराणसीसारख्या पवित्र भूमीत जे घडलं, त्याने मानवतेची शरमेने मान झुकवली आहे. अशा काळात देशाच्या सर्वोच्च नेत्याने संवेदना आणि जबाबदारीचं उत्तम उदाहरण दिलं आहे.
