अनधिकृत मस्जिदी आणि भोंग्यांवर फडणवीस सरकारची कडक कारवाई; पोलिसांकडून नियमावली जाहीर

विशेष प्रतिनिधी

मुंबई: अनधिकृत मस्जिदी आणि मशिदींवरील भोंग्यांच्या वाढत्या ध्वनीप्रदूषणाविरोधात फडणवीस सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलिसांनी एक सखोल नियमावली जाहीर केली असून, तिच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. ( Fadnavis government takes strict action against unauthorized mosques and gongs Police issues regulations)

पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, या नियमावलीनुसार, आता कोणत्याही अनधिकृत मस्जिदींवर भोंगे लावता येणार नाहीत. अधिकृत मशिदींना देखील स्थानिक पोलिसांकडून परवानगी घेतल्याशिवाय भोंगे लावण्याची परवानगी मिळणार नाही. तसेच, मशिदींवर भोंगे बसवले जात असतील, तर त्यासोबत ध्वनीप्रदूषण मोजणारी यंत्रेही अनिवार्यपणे बसवावी लागणार आहेत. या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तीन वर्षांपर्यंतची शिक्षा आणि एक लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जर एखाद्या मशिदीने तीन वेळा ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन केले, तर ती गंभीर बाब मानली जाईल आणि संबंधित व्यक्तींवर तीन ते पाच वर्षांपर्यंत कठोर शिक्षा होऊ शकते. या नियमांचे पालन होत असल्याची खात्री करण्यासाठी मुंबई शहरात सर्व अनधिकृत मस्जिदी आणि लावण्यात आलेले लाऊडस्पीकर यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, गेल्या चार महिन्यांपासून या संदर्भात सातत्याने आवाज उठवला. तपासणीत असे दिसून आले की, मुंबईत २००० हून अधिक मशिदींवर सुमारे ८००० भोंग्यांचा वापर सुरू होता, मात्र यापैकी फक्त २०० मशिदींनीच लाऊडस्पीकरसाठी कायदेशीर परवानगी घेतली होती. उर्वरित मशिदींनी कोणतीही परवानगी न घेता आवाज करणारे भोंगे लावले होते. यामुळे केवळ ध्वनीप्रदूषण वाढले नाही तर या बाबतीत कायद्याचा स्पष्टपणे भंग झाला होता.

मुंबई उच्च न्यायालयानेही २२ जानेवारी २०२५ रोजी एक आदेश दिला होता, ज्यात मशिदींवरील आवाज मर्यादित असावा, आणि सार्वजनिक ठिकाणी ध्वनीप्रदूषण नियंत्रणात ठेवावे, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने विधानसभेत याबाबत कडक निर्बंध जाहीर केले आणि महाराष्ट्र पोलिसांनी नियमावली अंमलात आणली, असे सांगून किरीट सोमय्या म्हणाले की मुंबईत अनेक भू-माफिया मशिदीच्या नावाखाली बेकायदेशीर बांधकामे करत आहेत आणि त्या ठिकाणी लाऊडस्पीकर लावून त्या जागेवर स्वतःचा हक्क सांगत आहेत. गेल्या दोन महिन्यांत त्यांनी अशा एका डझनपेक्षा अधिक अनधिकृत मस्जिदींची प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्या भागातील महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांना याचे पुरावे सादर केले.

सरकारकडून करण्यात आलेल्या या कारवाईचे किरीट सोमय्या यांनी स्वागत केले असून, जनतेने आता सतर्क राहून अशा कुठल्याही भोंग्यांचा आवाज जराही जास्त वाटल्यास, किंवा नियमभंग होत असल्यास स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांना देखील अशा तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.