एकनाथ खडसेंना भोवणार बेलगाम आरोप, गिरीश महाजन खेचणार न्यायालयात

विशेष प्रतिनिधी

मुंबई : पत्रकार अनिल थत्ते यांच्या एका मुलाखतीचा हवाला देऊन गिरीश महाजनांचे महिला सनदी अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांना चांगलाच भोवणार आहे. महाजन यांनी खडसे यांना अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे. ( Girish Mahajan will drag Eknath Khadse to court)

पत्रकार अनिल थत्ते यांनी कही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी केला होता. त्यात मंत्री गिरिश महाजन यांचे एका महिला अधिकाऱ्याशी संबंध आहेत. एका रात्री त्यांनी शंभरावर फोन केले होते, असा आरोप थत्ते यांनी केला होता. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील याच विषयावरून महाजनांवर टीका केली होती. मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावत महाजन यांनी एकनाथ खडसे आणि पत्रकार अनिल थत्ते यांना अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे.

या नोटीसमध्ये म्हटलं आहे की, कोणीही माझ्यावर काहीही आरोप करत असल्याने माझी प्रतिमा मलिन होते. त्यामुळे मी ही अब्रु नुकसानीची नोटीस माझ्या मुंबईतील वकीलाच्या मार्फत पाठवलेली आहे. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना ही नोटीस मिळाली असेल आणि त्याविरोधात आपण आता थेट कोर्टातच लढणार आहोत असं महाजन म्हटले आहे. झाल्या प्रकाराने मनस्ताप होऊन बदनामी झाल्याचे सांगत दोघांनीही जाहीर माफी मागावी किंवा पुरावे द्यावे अन्यथा कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावं, असे गिरीश महाजन म्हणाले.