विशेष प्रतिनिधी
नाशिक ; नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या तोडकामाला पहाटेपासून सुरुवात झाली आहे. मात्र हे अनधिकृत बांधकाम तोडण्याआधी रात्रीच्या वेळी तिथे हिंसाचार झाला. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. वाहनांची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. दगडफेक करणाऱ्या 15 लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 57 संशयास्पद मोटरसायकली पोलिसांकडून जप्त करण्यात आल्या आहेत. ( Violence breaks out while demolishing unauthorized construction of Dargah in Nashik 31 police personnel injured in stone pelting)
पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, बांधकाम काढण्यासाठी पथक आले होते . मात्र याचवेळी एका जमावाने विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांना समजावण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आले होते. मात्र त्यांनाही जुमानle नाही. प्रतिष्ठित नागरिक आणि पोलिसांवर दगडफेक केली. काही गाड्यांचे नुकसान केले. त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी सौम्य बळाचा वापर केला. सध्या परिस्थिती शांत आहे.
यावेळी वीजपुरवठा खंडित झाल्याचे पाहून जमावाने दगडफेक केली. वादग्रस्त धार्मिक स्थळाबाबत अफवा पसरल्याने तणाव निर्माण झाला होता. रात्रीच्या वेळी 500 पोलिसांचा बंदोबस्त होता. मात्र, जमाव 400 च्या वर होता. पालिकेने न्यायालयाच्या आदेशाने अनधिकृत दर्ग्याला 1 एप्रिलला नोटीस बजावली होती. स्वतःहून अनधिकृत बांधकाम काढून घ्या, अन्यथा तोडकामाचा इशारा दिला होता.
महानगरपालिकेने हे धार्मिक स्थळ अनधिकृत प्रार्थनास्थळांच्या यादीत असल्याचे नमूद करीत नोटीस बजावली होती. १५ दिवसांत स्वताहून ते काढून घ्यावे अन्यथा नंतर कोणत्याही क्षणी ते हटविले जाईल असे सूचित करण्यात आले होते. १५ दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिकेने या धार्मिक स्थळावर कारवाईला सुरूवात केली.
बांधकाम हटविण्यास विरोध करण्यासाठी जमाव हिंसक बनला. जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर व मुस्लीम नेत्यांवर दगडफेक केली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. दगडफेकीत तीन पोलीस वाहनांचे नुकसान झाले. तर २१ पोलीस जखमी झाल्याची माहिती पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिली. अनधिकृत धार्मिक स्थळ हटविण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे. पोलिसांनी संशयितांचे अटकसत्र सुरू केले आहे.
यापूर्वी 22 फेब्रुवारी रोजीही कारवाई करण्यात आली होती. पोलिसांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली होती. पण त्यावेळी परिसरात तणाव निर्माण झाला होता. शेकडो नागरिक काठे गल्ली परिसरात दाखल झाले होते.
